पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील पक्ष सोडण्याच्या तयारीत? 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता

Harshvardhan Patil : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil esakal
Updated on
Summary

अलीकडेच राजकीय वर्तुळात हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता.

इंदापूर : भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून पाच वर्षांपूर्वी प्रवेश केलेले राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची चर्चा असल्याने, तसेच त्यांची कन्या अंकिता पाटील व पुत्र राजवर्धन पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुतारी चिन्ह ठेवल्याने ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा आज (ता. 4) हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यात इंदापूरचे (Indapur) भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. याच साठी पाटील यांनी गुरुवार रोजी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवर तुतारीचा स्टेटस ठेवला आहे, ज्यामुळे त्यांच्या गटात प्रवेशाबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

Harshvardhan Patil
विधानसभेला आमदार शहाजीबापूंच्या अडचणी वाढणार; 'या' नेत्यानं थोपटलं दंड, सांगोल्यात महायुतीत बिघाडी?

अलीकडेच राजकीय वर्तुळात हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता त्यांच्या मुलाने तुतारीचा स्टेटस् ठेवून ही चर्चा अधिक प्रगल्भ झाली आहे. इंदापूर विधानसभा जागेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार गटाची गरज भासू शकते. यामुळे ते प्रवेश करणार असल्याचे दिसत आहे.

इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळणार

2019 मध्ये इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. व कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने पुन्हा हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी अडचणीत आली. कारण, इंदापूरची जागा अजित पवार गटाला पर्यायाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली.

Harshvardhan Patil
Vidhansabha Election : 'निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे'; भाजप नेत्याचा सूचक इशारा

शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेंना उधाण

या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू केले. याच पार्श्वभूमीवर इंदापूर येथील लोकसभेला शरद पवार गटाकडून काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने यामध्ये आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, महारुद्र पाटील, तेजसिंह पाटील यांनी बारामती येथे शरद पवारांची भेट घेत विधानसभेला पक्षातीलच उमेदवार देण्याची मागणी केली. त्यातच शरद पवार गटात प्रवेश सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश व उमेदवारीला विरोध केला.

मात्र, आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत असल्याने लोकसभेला सुप्रिया सुळे यांचे काम करणारे मूळ पदाधिकारी कोणती भूमिका घेतात यावरही इंदापूर विधानसभेचे चित्र अवलंबून असणार आहे. दरम्यान, याबाबत हर्षवर्धन पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.