पुणे (इंदापूर) : देशात मत्स्य व घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची दि. २१ नोव्हेबर रोजी मुदत संपत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहेत. मागील निवडणूकीत पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्र लढून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचा पराभवकेला होता मात्र या निवडणुकीत श्री. पाटील व जगदाळे एकत्र आहेत. त्यामुळे निवडणूकीत राज्यमंत्री भरणे व माजी मंत्री पाटीलयांच्यात जुगलबंदी व कलगीतुरा रंगणार आहे.
तालुक्यात ११४ ग्रामपंचायती व २५१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. या संस्थांमधून तसेच हमाल, मापाडी, तोलारी मतदार संघातून बाजार समितीचे संचालक निवडले जाणार आहेत. सोसायटी मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदार संघातून २ व हमाल मापाडी मतदार संघात एक व पणन १अशा एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सोसायटी मतदार संघाची सदस्य सुची सहायक निंबधक, ग्रामपंचायत मतदारसंघाची गटविकास अधिकारी व हमाल मापाडी यांची सदस्य सुची बाजार समितीने तयार केली असून पुढील आठवड्यात प्रारुप यादी जाहीर होणार आहे.
दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी १९६० साली शेतकरी सुखी तर जग सुखी या तत्वाने बाजार समितीची स्थापना केली. त्यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बाजार समितीवर सत्ता होती. मात्र २०१६ मध्ये निवडणुकीत राज्यमंत्री भरणे व जिल्हा बँकेचे संचालक जगदाळे यांनी १९ पैकी १२ जागा जिंकून बाजार समितीवर आपली सत्ता आणली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवड णुकीत भरणे व जगदाळे यांच्यात मनभेद झाल्याने बाजार समितीच्या राजकारणावर त्याचा परिणाम झाला.
जगदाळे यांनी माजी मंत्री पाटील यांना पाठिंबा दिल्याने बाजार समितीवर श्री. जगदाळे यांचे वर्चस्व राहिले .ग्रामपंचायत मतदार संघात राष्ट्रवादीकाँग्रेसचे वर्चस्व आहे तर सोसायटी मतदार संघात भाजपचे पारडे जड आहे. बाजार समितीने पाच वर्षाच्या कालावधीत जनावरे बाजार, फळे, फुले तरकारी बाजार,मासळी बाजार यामध्ये लक्षवेधी काम केले आहे. बाजार समिती निवडणूकीनंतर मिनी आमदारकीच्या समजले जाणाऱ्या तालुका खरेदी विक्री संघ ,जिल्हा बँक, पंचायत समिती,जिल्हापरिषद तसेच इंदापूर नगरपरिषद निवडणूकीचेपडघम वाजले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात तालुक्यात नंबर वन साठी राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असून काँग्रेस, रासप, बीएमपी, शिवसेना आपली ताकद अजमायचा प्रयत्न करणार आहेत. राजकीय किंगमेकर सक्रिय झाले असून राजकारणातील उगवते तारे व विद्यमान पदाधिकारी आपले शक्तिप्रदर्शन करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.