देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात; जूनमध्ये होणार शुभारंभ!

Sports_University
Sports_University
Updated on

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठास जूनपासून सुरुवात होईल आणि त्यात सुरुवातीस तीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल, असे सांगतानाच राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाचा पुरेसा उपयोग होत नाही. क्रीडा विद्यापीठाद्वारे तेथील सुविधांचा पुरेसा उपयोग करून घेतला जाईल, असेही सांगितले. 

देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात जूनपासून तीन स्पोर्टस्‌ सायन्स, स्पोर्टस्‌ टेक्‍नॉलॉजी आणि स्पोर्टस्‌ ट्रेनिंग या विषयावरील अभ्यासक्रम सुरू होतील. या तीनही विभागांत सुरुवातीस पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आम्ही प्रत्येक विभागास किती कालावधी असेल हे निश्‍चित केलेले नाही. तो सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत असेल, असेही केदार यांनी सांगितले. 

एक यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी सुमारे दीडशे व्यक्तींची मेहनत लागते. त्यामुळेच या विद्यापीठात खेळाविषयक सर्व बाबींचे प्रशिक्षण असेल, आम्ही यापूर्वी जे काही उपक्रम झाले, त्याबाबत अभ्यास करूनच हे विद्यापीठ सुरू करीत आहोत. त्यामुळे याबाबतचे विश्‍लेषण लगेच न करता एका वर्षांनी केल्यास योग्य होईल, असेही ते म्हणाले. 

क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा विचार होता, पण तेथील जागा कमी होती. त्यापेक्षाही बालेवाडीतील क्रीडा संकुलाचा पुरेसा उपयोग झालेला नाही. त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

बोगस क्रीडा प्रमाणपत्रांबाबतची चौकशी सुरू आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. बोगस प्रमाणपत्र देणारे जसे दोषी आहेत, तसेच त्याचा उपयोग करणारेही दोषी आहेत. त्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत. 
- सुनील केदार

नव्या क्रीडा विद्यापीठासाठी आणि प्रशासकीय गोष्टींसाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करणे, तरुण-तरुणींना क्रीडा क्षेत्राकडे वळविणे आणि राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक आणि खेळाडू निर्माण करणे, हा या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश आहे. 

विद्यापीठात १३३ पदांची भरती
क्रीडा विद्यापीठासाठी आवश्यकतेनुसार, ५ वर्षांकरीता २१३ पदांची (नियमित वेतनश्रेणीतील १६६ आणि ठोक वेतनश्रेणीतील ४७) भरती करण्याचे नियोजित आहे. कुलगुरू, रजिस्ट्रार, शिक्षक आणि प्रशासकीय पदांचा यामध्ये समावेश आहे, परंतु पहिल्या वर्षी १३३ पदांवर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती केदार यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.