शस्त्रास्त्रे आयात करण्यापेक्षा आत्मनिर्भर होणे आवश्‍यक : संरक्षण तज्ज्ञ

देशाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण युद्ध सामग्रीची निर्मितीवर भर देणे आवश्‍यक आहे.
संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल शशिकांत पित्रे
संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल शशिकांत पित्रे Sakal
Updated on

पुणे : भारत, चीनसह विविध देशांकडे अण्वस्त्र आहेत. पण अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात देशाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण युद्ध सामग्रीची निर्मितीवर भर देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शस्त्रास्त्रे आयात करण्यापेक्षा त्यांचे संशोधन, डिझाईन आणि उत्पादन या तिन्ही पातळ्यांवर देशाला आत्मनिर्भर होणे आवश्‍यक असून हाच संरक्षण सिद्धतेचा मूलमंत्र ठरेल. असे मत संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

बडोदे मित्र मंडळ आणि रेगे कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित मेजर जयवंत रेगे स्मृतिव्याख्यानात मेजर जनरल पित्रे (निवृत्त) यांनी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित झालेल्या बडोदे मित्र मंडळ, पुणेच्या आजीव सभासद आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना डॉ. सुजाता नातू यांचा सत्कार पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सुरेश रेगे, बडोदे मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय थोरात, विश्वस्त राजेंद्र माहुलकर, सचिव अजित केसकर आदी उपस्थित होते.

यावेळी पित्रे म्हणाले, ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक युद्धाचे स्वरूप बदलले असून त्यानुसार युद्धनीती आखणे आवश्‍यक आहे. युद्ध सज्जतेसाठी आर्थिक पाठबळ महत्त्वाचे आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच गरजेची आहे. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला वेळोवेळी साधन सामग्रींचा पुरवठा यासाठी निधीची गरज असते.

आज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) केवळ दीड टक्के वाटा संरक्षण क्षेत्राला मिळतो. तर चीन आपल्या जीडीपीतील ३ टक्के वापर हा संरक्षण क्षेत्रासाठी करत आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या देशांच्या संरक्षण क्षेत्रावर ही परिणाम होतो. भारतात दररोज नवीन स्टार्टअप येत असून त्यांच्या व उद्योगांच्या माध्यमातून स्वदेशी उपकरणांची निर्मितीत वाढ होऊ शकते.’’

देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने चीन या बलाढ्य राष्ट्राशी संवाद कायम ठेवत ‘डिप्लोमॅटीक’ पद्धतीने या देशाशी संबंध हाताळावे लागेल. तर पाकिस्तानची युद्धसज्जता पाहता आपण त्या राष्ट्राला कधीही नमवू शकतो. भारताने आपली संरक्षण सिद्धता केंद्रस्थानी ठेवून सर्व राष्ट्रंबरोबरचे संबंध जोपासताना राष्ट्रहित कायम अग्रस्थानी ठेवले पाहिजे. वेळप्रसंगी तात्कालिक परिणामांचा विचार न करता दीर्घकालीन राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे. असे ही पित्रे यांनी सांगितले. सूत्रसंचालन गायत्री जाधवराव यांनी तर, डॉ. प्रभाकर जोशी यांनी आभार मानले.

अंतराळ आणि सायबर युद्धासाठी तयार राहावे

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेला बदलाचा परिणाम आता देशाच्या संरक्षणावर होण्याची शक्यता आहे. पारंपारिक युद्ध नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माहिती, अंतराळ आणि सायबर युद्धात होत आहे. त्यासाठी तयार राहणे आवश्‍यक असून देशाने त्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पावले उचलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.