पुणे : पृथ्वीपासून नऊ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका आकाशगंगेतील (दीर्घिका) आण्विक हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. खोडद येथील महाकाय मिटरतरंग रेडिओ दुर्बिणीच्या (GMRT) साहाय्याने राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (NCRA) शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. विश्वाच्या ऐन तारुण्यातील अवकाशीय बदलांबद्दल यामुळे नवी माहिती समोर येण्यास मदत होईल. (Indian scientists have succeeded in measuring mass of molecular hydrogen in a galaxy)
बंगळूर येथील रमण रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आरआरआय) साहाय्याने एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन अॅस्ट्रॉफिजीकल जर्नल लेटरमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एनसीआरएतील संशोधक विद्यार्थी आदित्य चौधरी, बर्नाली दास, प्रा. निसिम्म काणेकर आणि आरआरआयचे डॉ. शिव सेठी आणि डॉ. के. एस. द्वारकानाथ यांचा संशोधनात सहभाग आहे. भारतीय अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आर्थिक साहाय्य लाभले.
संशोधनाची पार्श्वभूमी :
- सुमारे आठ ते १० अब्ज वर्षांपूर्वी विश्वात तारे निर्मितीचा वेग सर्वात जास्त होती.
- तारे निर्मितीची ही प्रक्रिया कमी कमी होत गेली. त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
- आकाशगंगेतील हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्याची पद्धती जीएमआरटीने विकसित केली
- याद्वारे आकाशगंगांतील हायड्रोजनरूपी इंधन कमी झाल्यामुळे तारा निर्मितीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट
असे झाले संशोधन :
- जीएमआरटीने हायड्रोजन अणूंमधून उत्सर्जित होणाऱ्या २१ सेंटीमीटर तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचे संकलन केले.
- अत्यंत कमकुवत असलेल्या या लहरींची संवेदनशीलता सुधारण्यासाठी स्टॅकींग तंत्रज्ञानाचा वापर
- तीन हजार आकाशगंगांमधल्या हायड्रोजनचे सरासरी वस्तुमान मोजण्यात आले.
संशोधनाचे निष्कर्ष :
- नऊ अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगा आण्विक वायुंनी समृद्ध होत्या.
- त्यांतील आण्विक वायुंचे वस्तुमान हे त्या आकाशगंगेत ताऱ्यांच्या तिप्पट होते.
- आपल्या आजच्या आकाशगंगेत (मंदाकिनी) आण्विक वायूचे वस्तुमान ताऱ्यांच्या वस्तुमानापेक्षा १० पटीने कमी आहे.
२०१८मध्ये आम्ही यासंबंधीच्या संशोधनाला सुरवात केली. आमच्याकडे आकाशगंगा जरी कमी असल्या तरी सुमारे ४०० तास आम्ही यासंबंधी निरीक्षण घेतली. गोळा झालेल्या प्रचंड डेटातून हे विस्मयकारक निष्कर्ष हाती लागले.
- बर्नाली दास, संशोधक विद्यार्थी, एनसीआरए
सुरवातीच्या आकाशगंगेतील तारानिर्मीतीचा वेग इतका जास्त आहे की, त्यांच्याकडे असलेला आण्विक वायु ते दोन अब्ज वर्षात संपवून टाकतील. एकदा का आण्विक हायड्रोजन कमी झाला, तर त्यांचा तारा निर्मितीचा वेग कमी होतो. आणि नंतर तारानिर्मितीची प्रक्रियाच थांबते.
- आदित्य चौधरी, संशोधक विद्यार्थी, एनसीआरए.
पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.