पुणे : ‘‘आम्हाला, खाणे नको, पाणी नको...फक्त आणि फक्त आम्हाला येथून बाहेर काढा. आम्ही, वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी असून युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागात अडकून पडलो आहोत. आम्हाला येथून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे,’’ अशा शब्दांत अन् पाणावलेल्या डोळ्यांनी युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी भावना व्यक्त करत आर्त विनवणी करत आहेत. (Indian Student In Ukraine)
रशिया-युक्रेनमध्ये धगधगणाऱ्या युद्धात आजही शेकडो भारतीय विद्यार्थी होरपळत आहेत. युक्रेनमधील मुख्यतः किव्ह, खारकीव, सुमी भागात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. किव्हमध्ये रशियन सैन्य शिरल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्याशिवाय स्थानिकाकडून मदत मिळण्याचे मार्गही बंद होत आहेत. बंकर, वसतिगृह अशा विविध ठिकाणी हे विद्यार्थी एकत्रित सध्या आहेत. परंतु बाहेर युद्धजन्य परिस्थिती असल्याने हे विद्यार्थी घाबरले आहेत.
किव्ह, खारकीवमधून विद्यार्थी मिळेल, त्या मार्गाने युक्रेन देशाबाहेर पडण्यासाठी सीमेवर पोचत आहेत. परंतु युक्रेनबाहेर जाताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: युक्रेनमधून स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. युक्रेनच्या सीमेवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत भारतीय दूतवासाने राष्ट्रध्वज आणि सीमारेषा ओलांडण्यासाठी अधिकृत पत्र सोबत दिले आहे. परंतु तरीही सीमेवर संबंधित लष्कराकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगत आहेत. युक्रेनच्या विविध भागातूनही सीमा भागाकडे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील सैनिक पुन्हा माघारी पाठवीत आहेत.
‘‘आता किव्हमधील परिस्थिती खूप गंभीर झाली असून रशियन सैनिक सर्वत्र आहेत. काल रोमानियाला जाण्यासाठी बाहेर पडलेले काही विद्यार्थी रेल्वे स्टेशनपर्यंत पोचून शकले. काहींना रेल्वेने जाता आले. तर काही विद्यार्थ्यांना माघारी पाठविण्यात आले. आम्हाला येथून बाहेर पडायचे आहे.’’, असे किव्हमध्ये अडकलेला आकाश हिंगे याने सांगितले.
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अशी आहे स्थिती :
- रशियन सैन्य शिरल्याने किव्हच्या स्थानिक नागरिकांकडून मदत मिळण्याचे मार्ग बंद
- युक्रेन- रोमानिया सीमारेषेवर जवळपास तीन हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत
- युक्रेनच्या सीमेवर पोचूनही सीमारेषा पार करण्यासाठी करावी लागतीयं प्रतीक्षा
- युक्रेनच्या सीमेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवले जातंय
- आहे त्या ठिकाणी जेवणाची अपुरी सुविधा
‘‘युक्रेनमधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे माझे काही मित्र गेल्या दोन दिवसांपासून युक्रेन-रोमानिया बॉर्डरवर अडकून पडले आहेत. तिथे जवळपास दोन ते तीन हजार भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांना सीमा पार करता येत नाहीये. हे विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून खाण्या-पिण्याशिवाय तेथे आहेत.’’
- वरद कोंढरे, बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिर्व्हसिटी (भारतीय विद्यार्थी)
‘‘गेल्या दोन दिवसांपासून युक्रेन-रोमानिया सीमेवर आहे. दररोज काही विद्यार्थ्यांना सीमा ओलांडायची परवानगी दिली जात आहे. परंतु यामध्ये कन्सल्टन्सी एजन्सी देखील पुढाकार घेत आल्याचे दिसत आहे. या सीमेवर जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी अडकले आहेत. दोन दिवसांपासून आम्ही जेवण म्हणून केवळ ब्रेड (पाव) खात आहोत.
व्यवस्थित जेवण मिळत नसल्याने आणि खुल्या मैदानात दिवस घालवावा लागत असल्याने अनेक विद्यार्थी आजारी पडत आहेत. दिवसा येथे पाच अंश सेल्सिअस तापमान असते आणि रात्री किमान तापमानाचा पारा शून्यापर्यंत जातो. त्यामुळे कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागत आहे. परंतु भारतीय दूतावासाने किमान किती वेळ लागणार आहे, याची किमान पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना द्यायला हवी, तेवढाच आम्हाला आधार मिळेल.’’
- अंजली कलोहिया (युक्रेन-रोमानिया सीमेवर अडकलेली विद्यार्थिंनी- हरियाना)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.