‘जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था आपल्या देशात आहे.
पुणे - ‘जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये भारताचा (India) समावेश होत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप (Startup) परिसंस्था आपल्या देशात आहे. आज संपूर्ण जगावर भारत प्रभाव पाडत आहेत. युक्रेनच्या (Ukraine) संकटात ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) या मोहिमेद्वारे प्रत्यक्ष युद्ध (War) क्षेत्रातून आपण भारतीयांना सुरक्षित (Secure) बाहेर काढत आहोत. जगभरातील मोठ-मोठ्या देशांना देखील असे करताना अनेक संकटांना (Crisis) तोंड द्यावे लागले. परंतु भारताच्या वाढत्या प्रभावामुळे हजारो विद्यार्थ्यांना (Students) आपण मायदेशी परत आणू शकलो,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काढले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव आणि ‘सिंबायोसिस आरोग्य धाम’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजूमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सिंबायोसिसच्या ‘वसुधैव कुटूंबकम्’ या ब्रीदवाक्याचा उल्लेख करत भारताचा प्राचीन वारसा आधुनिक अवतारात आजही पुढे जात असल्याचे कौतुकोद्गार मोदी यांनी काढले.
जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढत असल्याचे सांगत मोदी यांनी,‘‘परिवर्तन हे सरकारचे ‘रेकॉर्ड’ बनविण्यासाठी नाही, तर हे परिवर्तन तरुणांसाठी संधी म्हणून आहे.’, असेही सांगितले. ते म्हणाले,‘‘देशाचे सरकार युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळेच एकामागून एक क्षेत्र तुमच्यासाठी खुली करत आहोत. त्यांचा फायदा घेत तरुणांनी नवनवीन स्टार्टअप सुरू करावेत. देशात अनेक आव्हाने आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत. त्याचे समाधान विद्यापीठातून, तरूणांच्या डोक्यातून निघायला हवे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरीही तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करता, तसे ध्येयही देशासाठी असायला हवे.’ असा सल्ला मोदी यांनी तरुणांना दिला. ‘आपला स्वत:चा विकास हा राष्ट्रीय विकासाशी कसा जोडता येईल, यासाठी प्रयत्न करा’ असेही त्यांनी नमूद केले. स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा अभियानाचा उल्लेखही मोदी यांनी भाषणात केला. कोरोना काळात संपूर्ण जगाला भारताचे सामर्थ्य दिसले, हे पुण्यातील नागरिक चांगलेच जाणतात, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमात डॉ. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. तर विद्यापीठातील नित्या भारद्वाज या विद्यार्थिनीला सूत्रसंचालन करण्याची संधी देण्यात आली.
पूर्वीचे सरकार बचावात्मक व परावलंबी
‘पूर्वीच्या बचावात्मक आणि परावलंबी मानसिकतेचा दुष्परिणाम सहन न करणारी तुमची पिढी एकप्रकारे नशीबवान आहे. याचे श्रेय तुम्हा तरुणांना जाते.’ असे सांगत मोदी यांनी आधीच्या सरकारवर टिप्पणी केली. ते म्हणाले,‘‘आतापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:च्या पायावर पुढे जाण्याचा विचारही केला नव्हता, अशा क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे केवळ बाहेरील देशातून मागविली जात होती. संरक्षण क्षेत्रातही तीच परिस्थिती होती. आज परिस्थिती बदलली आहे. मोबाईल उत्पादनात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सात वर्षांपूर्वी भारत केवळ दोन मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या होत्या, आता दोनशेहून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. संरक्षणात भारत हा जगातला मोठा निर्यातदार बनत आहे. देशात दोन मोठे ‘डिफेन्स कॉरिडॉर’ तयार होत असून तेथे मोठमोठी हत्यारे बनविली जाणार आहेत. स्वातंत्र्य भारताच्या ७५ वर्षात नवीन भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत. त्याचे नेतृत्व युवा पिढी करत आहे.’’
‘सिंबायोसिस’ने दरवर्षी संकल्पनेवर आधारित परंपरा विकसित करावी
दरवर्षी एका संकल्पना निवडून संपूर्ण वर्ष त्या संकल्पनेवर योगदान देण्याची परंपरा ‘सिंबायोसिस’ने विकसित करावी. यामध्ये हवामान बदल, जागतिक तापमान वाढ अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन काम करावे. त्या संकल्पनेवर आधारित अध्ययन, संशोधन, चर्चासत्रे असे उपक्रम राबवावेत. समस्येवर उपाय शोधावेत, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. तर ‘‘मोदीजींनी संकल्पनेवर आधारित योगदानाची परंपरा विकसित करण्याचा सल्ला दिला, त्यावर निश्चित काम करू’’, असे डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी गप्पा मारताना दिलखुलासपणे सांगितले.
नवीन संकल्पना, संशोधन पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्याचे आवाहन
‘देशाची गरज ओळखून त्यावर समाधान शोधणाऱ्या, समस्या सोडविणारे उपाय, संकल्पना आणि संशोधने पंतप्रधान कार्यालयाला पाठवा,’ असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.