Indigenous Tank : भारताची आता स्वयंचलित रणगाडा मोहीम

स्वयंचलित वाहनाबद्दल आपण नक्की ऐकले असेल. एवढंच काय, स्वयंचलित ड्रोन सध्या संरक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे.
Indigenous tank
Indigenous tanksakal
Updated on

पुणे - स्वयंचलित वाहनाबद्दल आपण नक्की ऐकले असेल. एवढंच काय, स्वयंचलित ड्रोन सध्या संरक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे. आता त्याही पुढे जात भारताने स्वयंचलित रणगाड्यांच्या निर्मितीसाठी पावले उचलली आहेत. सैनिकांविना डोंगरदऱ्यांमध्ये फिरण्यासाठी स्वयंचलित रणगाड्याला सक्षम केले असून, येत्या काळात त्याला आधुनिक युद्ध तंत्राद्वारे विकसित करण्यात येणार आहे.

पाषाण येथे गुरुवारपासून (ता. ११) ‘स्वयंचलित तंत्रज्ञान आणि प्रणाली’ विषयीच्या परिषदेचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्‌घाटनानंतर ‘सकाळ’शी बोलताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शस्त्रास्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणालीचे (एसीई) महासंचालक डॉ. शैलेंद्र गाडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे संरक्षण क्षेत्रातील युद्धनीतीत मोठे बदल होत आहेत.

मानवविरहित वाहने आणि ड्रोनवर सध्या विशेष काम चालू आहे. आम्ही आता स्वयंचलित रणगाड्यावर काम सुरू केले असून, वाळवंटापासून ते डोंगरदऱ्यांपर्यंत तो स्वयंचलित पद्धतीने फिरू शकतो, एवढा सक्षम करण्यात येत आहे. खरे आव्हान तर पुढे आहे. आधुनिक युद्धतंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे शिकविणे सर्वांत अवघड काम आहे. तेच आमच्या समोरील सध्याचे मोठे आव्हान आहे.’

परिषदेच्या उद्‌घाटनाला संशोधन आणि विकास आस्थापनाचे (अभियांत्रिकी) संचालक डॉ. मकरंद जोशी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि स्टार्टअप यांना प्रोत्साहन देणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. डी. बी. सरवदे यांनी दिली.

स्टार्टअपने शस्त्रास्त्र उत्पादनात उतरावे

संरक्षण क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप येत आहेत. मात्र ती सर्व ड्रोन आणि रोबोटिक तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित आहेत. त्यांनी छोटी हत्यारे आणि शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रातही उतरायला हवे, त्याचा मोठा फायदा संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशीकरणाला होईल, असे मत डॉ. शैलेंद्र गाडे यांनी व्यक्त केले.

एक्सलन्स सेंटर्स

उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना बरोबर घेण्यासाठी डीआरडीओ इंडस्ट्री अकॅडमिया सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकासाची कामे केली जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर काम केले जाईल, अशी माहिती डॉ. मकरंद जोशी यांनी दिली.

आव्हाने

  • डोंगर-दऱ्या, नदी किंवा युद्ध मैदानातील आव्हानात्मक मार्गिकेसाठी सज्ज करणे

  • स्वयंचलित पद्धतीने लक्ष्य निवडणे, त्याविषयीचा अंदाज बांधणारी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणे

  • समोर उभ्या असलेल्या शत्रूला क्षणार्धात ओळखत हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्र किंवा तोफगोळा डागण्याच्या तंत्रज्ञानाची बांधणी

  • अचूक, सक्षम, वेगवान आणि तेवढीच क्लिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.