- अशोक बालगुडे
उंड्री - शेतीची मशागत, बियाणे, खते यावर भरमसाठ खर्च केल्यानंतर शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेला तर त्याला भाव मिळत नाही. शेतीचे तुकडे झाल्यामुळे बैल सांभाळणे कठीण झाले आहे, तर इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर घेणे परवडेणा आणि भाड्याने शेती करता येईना, अशी अवस्था झाल्याचे वडकी, उंड्री, होळकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
इंधनाच्या दरवाढीने पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, डिझेलने शंभरी पार केली आहे. डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 36 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर 100.08 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोल आज लिटरमागे 33 पैशांनी महागले. पॉवर पेट्रोलचा दर आज 114.60 रुपये लिटरवर गेला आहे. मागिल 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
शेतकरी लक्ष्मण मोडक (वडकी, ता. हवेली) म्हणाले की, शेतकरी संघटनांकडून शेतमालाच्या हमीभावासाठी ओरड केली जात आहे, मात्र अद्याप त्याला यश आले नाही. निवडणुका आल्या की, सर्व पक्षांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो आणि निवडणुकांचा धुराळा संपला की, त्यामध्ये ते विरून जातो, अशी आजपर्यंतची अवस्था आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय शेती निसर्गावर अवलंबून आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदल, रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. त्यातच शेतमाल चांगला आला, तर बाजारभाव पडतात. कांदा, टोमॅटोचे भाव वाढले की, ओरड होते मात्र, ते कांदा-टोमॅटो मालमोल भावाने विकत अनेकवेळा बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला टाकून द्यावे लागतात. उभ्या पिकामध्ये जनावरे सोडण्याची वेळ येते. त्यावेळी कोणी मदतीसाठी येत नाही, अशी खंत उत्तम कानडे (उंड्री, ता. हवेली) यांनी व्यक्त केली.
शिवाजी कोतवाल (उंड्री, ता. हवेली) म्हणाले की, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांपासून ते बियाणांना हमीभाव असेल तर, शेतमालालासुद्धा हमीभाव असला पाहिजे. मजुराला नियमित रोजगार मिळत नसल्याने शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. शेतीचे तुकडे झाले आणि क्षेत्र कमी झाल्याने दोन बैल सांभाळणे कठीण झाले असून, ट्रॅक्टर घेणेही परवडत नाही, अशी अवस्था झाली आहे, असे त्यांनी सांगितले..
एक एकर नांगरट करण्यासाठी अडीच हजार, पाळी घालण्यासाठी एक-दीड हजार रुपये भाव आहे. तेही वेळेत मिळत नाही. शेतीची मशागत व्यवस्थित होत नाही. बैलाच्या साहाय्याने शेताच्या कडाकोरा नीट करता येतात. त्यामुळे बहुतेकजण बैलांचीच शेती करतात, असे होळकरवाडी (ता. हवेली) राजाराम झांबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.