मंचर : वडील हमालीचे तर आई शेतमजूरीचे काम करते. अत्यंत प्रतिकूल परस्थितीवर मात करून जिद्दीने सीएच्या परीक्षेला गवसणी घालून शेवाळवाडी(ता.आंबेगाव) येथील पल्लवी अर्जुन चिखले यांनी यश संपादन केले आहे. पल्लवी यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मंचरच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर शेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात चिखले कुटुंब राहत आहे. त्यांना श्वेता, पल्लवी व सिद्धेश ही तीन अपत्य आहेत.फक्त तीस गुंठे मुरमाड जमीन आहे.शेतीचे फारच अल्पश उत्पन्न.
त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागविणे व मुलांचे शिक्षण पूर्ण करणे हा मोठा आर्थिक पेच प्रसंग वडील अर्जुन शिवाजीराव चिखले व आई संगिता अर्जुन चिखले यांच्यापुढे होता. अर्जुनराव यांचे शिक्षण ७वी व संगिता यांचे शिक्षण ५ वी पर्यंत झाले आहे. कमी शिक्षणामुळे त्यांना काम मिळत नव्हते. मुलांचे शिक्षण झाले पाहिजे ही खुणगाठ मनाशी त्यांनी बाळगली होती.
अर्जुनराव यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडते शांताराम थोरात यांच्याकडे हमालीचे काम सुरू केले. थोरात यांनीही वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला.आई संगिता यांनी आजूबाजूला शेतावर काम करण्यास सुरुवात केली.
तिनंही मुलांचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्हा परिषदेच्या शेवाळवाडी शाळेत, इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय मंचर व त्यानंतर अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण झाले.पल्लवीने एसपी कॉलेजला २०१९ ला बी कॉम शिक्षण पूर्ण केले. तीन वर्ष सीएचा अभ्यासक्रम नियमितपणे केला. त्यातून तिने यश संपादन केले.
“माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले.त्यांनी मला सतत प्रेरणा व प्रोत्साहन दिले. नियमित एकाग्रतेने वाचन, सराव व अभ्यास केला.निकाल समजला. मी पास झाल्याचे ऐकून आई व बाबांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून माझे हृदय हेलावून गेले. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी आईवडिलांची अपार मेहनत सतत डोळ्यासमोर ठेऊन नियमित अभ्यास करावा. यश नक्कीच मिळते.असा माझा अनुभव आहे.”
“मला व तीच्या वडिलांना इच्छा असूनही आर्थिक नाजूक परस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. पण मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असे आमचे स्वप्न होते.ते पूर्णत्वास नेण्याचे काम मुलांनी केले. याचा मला सार्थ अभिमान आहे.
मोठी मुलगी श्वेता निखील शेवाळे अभियंता झाली असून मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे.सीए ची परीक्षा फार अवघड असते असे नातेवाईक व आजूबाजूचे लोक सांगत होते.त्यामुळे चिंता वाटत होती पण निकाल लागला. तीच्या शिक्षणासाठी अर्धपोटी राहून केलेल्या प्रयत्नांना यश आले.मुलगा सिद्धेशने नुकतीच बीएससीची पदवी संपादन केली आहे.”
- संगिता अर्जुन चिखले, आई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.