पुणे : जागतिक पातळीवर काम करू शकणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने आता राज्यातील शासकीय आयटीआयमधील ‘संस्था व्यवस्थापन समिती’ची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) ही योजना २५० आयटीआयमध्ये कार्यान्वित आहे. या अंतर्गत २००७-०८ ते २०११-१२ या कालावधीत प्रत्येक संस्थेला अडीच कोटी रुपये बिनव्याजी कर्ज टप्प्या-टप्प्याने देण्यात आले आहे.
या कर्जातून आयटीआयचा दर्जा वाढविणे तसेच उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय जागतिक पातळीवर काम करू शकणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये तसेच त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यासाठी आयटीआय संस्था स्तरावर सर्वंकष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हे साध्य करण्यासाठी आयटीआयच्या संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा संस्थेला लाभ होऊन एकूणच संस्थेच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळेच या समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भातील अध्यादेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने काढला आहे. त्यानुसार आता ही समिती एकूण ११ सदस्यांची असेल. यात सहयोगी उद्योजक किंवा त्यांचा प्रतिनिधी अध्यक्ष असेल.
समितीत जिल्ह्यातील अन्य नामांकित औद्योगिक आस्थापनांचे चार प्रतिनिधी, राज्य सरकारमार्फत नामनिर्देशित केलेल्या स्थानिक शैक्षणिक/तांत्रिक/सामाजिक/ व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या आणि व्यवसाय शिक्षणाप्रती रुची असलेल्या दोन तज्ज्ञ व्यक्ती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, आयटीआयमधील ज्येष्ठ गट निदेशक/ज्येष्ठ शिल्प निदेशक, विद्यार्थी प्रतिनिधी हे सदस्य असतील. सदस्य सचिव म्हणून प्राचार्य काम पाहतील.
आयटीआयचा विकास आराखडा तयार करणे आणि मान्यतेसाठी राज्य सुकाणू समितीकडे सादर करणे
आराखड्यात निश्चित केल्यानुसार विविध कामांची अंमलबजावणी करणे आणि प्रगतीची देखरेख करणे
आयटीआयची दीर्घकालीन उद्दिष्टे ठरविणे आणि आवश्यक मूलभूत सुविधांची उभारणी करणे
केंद्र/राज्य सरकारच्या योजनांतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करणे
महिला प्रशिक्षणार्थ्यांचे प्रवेश वाढविण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम राबविणे
आयटीआयमधील संस्था व्यवस्थापन समितीच्या पुनर्रचनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा संस्थांना होणार आहे. त्याशिवाय संस्थांच्या विकासासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे. समितीच्या पुनर्रचनेमुळे संस्थांचा विकासाला दिशा मिळू शकणार आहे.
- आय. आर. भिलेगावकर, प्राचार्य, शासकीय आयटीआय (मुली), औंध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.