पुणे - वर्षभर चांगले काम केले तर मोठी पगारवाढ मिळेल, तसेच नवीन कंपनीत रुजू झाल्यास आणखी चांगले पॅकेज मिळेल, या आशेवर असलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी निराशा पडली आहे. कोरोनानंतर आयटी क्षेत्राला बसलेल्या फटक्यामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ देण्यात हात आखडता घेतला आहे.
काही कंपन्यांनी नवीन कर्मचारी घेताना पगारवाढ देण्याच्या धोरणालाच कात्री लावली आहे. त्यामुळे आयटीयन्समध्ये मोठी नाराजी आहे. योग्य पगारवाढ न झाल्यास नवीन नोकरी शोधू आणि तिकडून पॅकेज वाढवून घेऊ या विचारात असलेल्या आयटीयन्समध्ये कंपन्यांच्या या नवीन धोरणामुळे नाराजी आहेत. आहे तिथे पगारवाढ मिळेना, नवीन ठिकाणी गेलो तर वाढ मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसेना आणि गुंतवणूक वाढवता येईना, अशी अनेकांची स्थिती आहे.
काय आहे नेमकी स्थिती
किमान आठ टक्के पगारवाढ
नव्या कंपनीत रुजू होताना हार्इक देण्यास काही कंपन्यांचा स्पष्ट नकार
चांगली पगारवाढ न झाल्याने अनेकांची नाराजी
रेटिंग जास्त पण पगारवाढ घटली
तक्रार केल्यास एचआर विभागाचे कानावर हात
किरकोळ वाढ
दहा वर्षांपूर्वी फ्रेशरर्सना सुमारे अडीच लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. सध्या ही रक्कम तीन ते साडेतीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. म्हणजे दहा वर्षांत त्यांच्या पॅकेजमध्ये केवळ एक लाख रुपयांची वाढ झाली आहे. मुळातच कमी पगार. त्यात अत्यल्प वाढ, अशा दुहेरी कात्रीत अनेक आयटीयन्स सापडले आहेत. त्यामुळे अनेकांनी तर क्षेत्र सोडण्याची तयारी केल्याची माहिती आयटी क्षेत्रातील कामगार संघटनांनी दिली.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पगारवाढ द्यायलाच हवी. त्यातून कंपनीलाच फायदा होतो. मात्र आता पगारवाढीचे प्रमाण आठ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तर काही बड्या कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांना पगारवाढच द्यायची नाही, असे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आयटीयन्सची निराशा होत आहे. याचा परिणाम एकूण त्यांची जीवनशैली आणि कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर होईल.
- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट
एप्रिल महिन्यात आमच्या कंपनीत पगारवाढ झाली. गेल्या वर्षी माझा पगार १५ टक्क्यांनी वाढला होता. यंदा त्यात केवळ आठ टक्के वाढ झाली. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत मी चांगले काम गेले. त्यामुळे मला कंपनीने रेटिंगही चांगले दिले. मात्र तुलनेत वाढ कमी झाली. माझ्यासह अनेकांच्या बाबतीत हेच घडले आहे. त्यामुळे आता मी नवीन नोकरीच्या शोधात आहे.
- शुभम, आयटीयन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.