Pune News : जांभूळवाडी तलावात एक ते दीड टन मासे मृत; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जांभूळवाडी तलावात एक ते दीड टन मासे मृत झाल्याची घटना घडली.
Jambhulwadi lake
Jambhulwadi lakesakal
Updated on

आंबेगाव - दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जांभूळवाडी तलावात एक ते दीड टन मासे मृत झाल्याची घटना घडली. गेल्या तीन वर्षातील ही तिसरी घटना असून त्यामुळे तलावाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले. अगोदरच तलावात जात असलेले सांडपाणी आणि त्यात मासे मेल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तलावातील जलपर्णीतच मासे सडून गेल्याचे दृश्य समोर आले आहे. तर महापालिकेकडून काढण्यात आलेल्या जलपर्णीच्या ढिगाऱ्याखाली मासे गाडले गेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

तलाव परिसरात वाढलेल्या नागरीवस्तीतील ड्रेनेजचे पाणी दिवसाढवळ्या तलावात सोडले जाते आहे. शिवाय परिसरात असलेल्या विविध कंपन्या आणि सिमेंट प्लांट यातीलही रसायन मिश्रित सांडपाणी थेट तलावात सोडले जाते आहे. यावर पाटबंधारे विभाग आणि महापालिकेची उदासीनता दिसून येते आहे.

नुकतीच महापालिकेकडून तलावाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली असली तरी तलावात सोडले जात असलेल्या दूषित पाण्याची सोय महापालिकेकडून अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलावातील पाण्यावर तेलकट तवंग दिसून येत असून तलावाचे पाणी काळेशार झाले आहे. आणि पाण्याचा दुर्गंधीयुक्त वासही येतो आहे.

नव्याने महापालिकेत सामाविष्ट झालेला जांभूळवाडी तलाव नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे.दरम्यान तलावाचे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे देखभालीसाठी हस्तांतरण झाले असले तरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पाटबंधारे विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवतात.पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या या धोरणाने तलाव मात्र दुर्लक्षित राहिल्याचे  चित्र पाहायला मिळते आहे.गेली सलग दोनवर्ष तलावात  मासे मरण्याच्या घटना घडत आहेत.त्यानंतर आज या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

तलावातील वाढलेली जलपर्णी काढण्याचे कंत्राट महापालिकेकडून ठेकेदाराला देण्यात आले आहे. वाढणारी जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी किंवा ती नष्ट होण्यासाठी कंत्रादारांकडून रासायनिक फवारणी केली जाते. त्याचा परिणाम जलचरांवर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा स्थानिक करत आहेत. तर मागील वर्षी कंत्राटदाराने हा फवारणीचा प्रयोग केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. कंत्रादारांच्या चुकार भूमिकेमुळे विषबाधा होवून मासे मेल्याची शक्यता स्थानिक वर्तवत आहेत.

टेंडरच्या मुदती पूर्वीच जलपर्णी सुकते कशी?

जलपर्णी काढण्याचे कंत्राट मार्च अखेर संपणार आहे. त्यात गतवर्षीचा विचार करता मार्च महिना जवळ येताच जलपर्णी सुकते आणि कंत्रादारांकडून तलाव स्वच्छ केल्याचा दावा केला जातो आहे. आणि टेंडर चे पूर्ण बील पास करून घेतले जाते आहे. दरम्यान टेंडर संपण्यापूर्वीच जलपर्णी कशी काय सुकते? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. तर जलपर्णीवर रासायनिक फवारणी केल्याने ती सुकून तिची वाढ होणे थांबत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

काढलेल्या जलपर्णीचे सांडव्यातच ढिगारे

तलावातून जलपर्णी काढण्याचे कंत्राट महापालिकेकडून ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानंतर ठेकेदाराने तलावातील जलपर्णी काढली असली तरी त्याच्या ढीगारे तलावाच्या सांडव्यात ठेवले आहेत. पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास संडव्यातून विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते आहे.

प्रतिक्रिया -

जांभूळवाडी तलाव येथील मुख्यवाहिनी टाकून झाली आहे. शिवाय येथील नव्वद टक्के सांडपाणी देखील टॅप झाले आहे.चार ब्रांच लाइन पैकी तीन लाइन जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल .

- सिद्धराम पाटील, कनिष्ठ अभियंता मलनिस्सारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.