पुणे : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूंच्या संसर्गाविरोधात भारताने थेट युद्ध पुकारून सोमवारी (ता.२२) एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी नेमकी उपचार पद्धती डॉक्टरांना गवसली, विषाणू प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश मिळाले. मात्र, हजारो रुग्णांचे प्राणही या कोरोनाने घेतले. या विषाणूंविरोधातील युद्धाचा दुसरा टप्पा आता सुरू आहे. त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पहिला जनता कर्फ्यू गेल्यावर्षी २२ मार्चला जाहीर केला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील जनता कर्फ्यूच्या आठवणींना उजाळा मिळाला.
शहरातील गजबजलेले चौक, रहदारीचे रस्ते, खरेदीसाठी गर्दीने सातत्याने फुललेल्या बाजारपेठा सर्व काही ठप्प करणारा हा पहिला दिवस ठरला. खऱ्याअर्थी ही लॉकडाउनची रंगीत तालीम ठरली. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळात हा कर्फ्यू होता. या काळात पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संध्याकाळी थाळी आणि टाळ्या वाजवून पुणेकरांनी यातील सहभाग स्पष्ट दाखवून दिला होता.
पुणे शहरात सलग पाचव्या दिवशी अडीच हजारांहून अधिक रुग्ण
दरम्यान, पुणे शहरात रविवारी (ता.२१) सलग पाचव्या दिवशी एकाच दिवसात अडिच हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हीच जिल्ह्यातील एका दिवसातील रुग्णांची संख्या ५ हजार ४०८ एवढी आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात गेल्या २४ तासात २ हजार ९०० जण नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.
रविवारच्या रुग्णांच्या एकूण संख्येत शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. उर्वरित रुग्णांपैकी पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ४१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८०९, नगरपालिका हद्दीत १८९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९४ नवे रुग्ण सापडले आहेत.
तसेच रविवारी दिवसभरात २ हजार ५३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील १ हजार २४५, पिंपरी चिंचवडमधील ७९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६५, नगरपालिका क्षेत्रातील ८५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४४ रुग्णांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त रविवारी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील
सर्वाधिक २० जण आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील आठ, जिल्हा परिषद आणि नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५६९रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४५३ जण जिल्ह्याबाहेरील आहेत.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.