जपान दूतावासाने पुणे महापालिकेचे टोचले कान; काय आहे नेमकं प्रकरण?

Pune_Municipal_Corporation
Pune_Municipal_Corporation
Updated on

पुणे : 'जायका' प्रकल्पावरून केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने फटकारल्यानंतर आता जपान दूतावासाने देखील याच प्रकल्पावरून पुणे महापालिकेचे कान टोचले आहेत. या संदर्भात भारतातील जपानचे दूतावास यांनी पत्र पाठवून या प्रकल्पाच्या कामावर आमचे बारीक लक्ष असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यामध्ये जातीने लक्ष घालावे, अशा सूचना केल्या आहेत. 

राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच्या निविदांवरून केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 6 ऑगस्टच्या बैठकीत महापालिकेला फटकारले होते. जायकाने निश्‍चित करून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन महापालिकेकडून होत नाही. निविदा रद्द करावयाच्या असतील, करारानुसारच प्रस्ताव सादर करावा लागेल, असेही या बैठकीत जलशक्ती मंत्रालयाकडून महापालिकेला बजाविण्यात आले होते. असे असतानाच भारतातील जपानच्या दूतावासाने या संदर्भात पत्र पाठवून जलशक्ती मंत्रालय आणि महापालिकेला पत्र पाठवून कान टोचले आहेत. त्या पत्राची प्रत 'सकाळ'च्या हाती लागली आहेत. 

पुणे शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 990 कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महापालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या एनआरसीडी आणि जायकाकडून 841 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत सहा ठिकाणी सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून चार, पाच, सहा आणि आठ अशा चार पॅकेजमध्ये निविदा काढल्या आहेत. या निविदा काढून एक वर्ष पूर्ण झाले. अद्याप त्यावर महापालिकेला निर्णय घेणे जमलेले नाही. 

त्यामध्ये पॅकेज पाच (भैरोबा नाला) आणि पॅकेज सहा (डॉ. नायडू हॉस्पिटल परिसर) या ठिकाणचे काम सर्वांत कमी दराने निविदा भरल्यामुळे तोशिबा वॉटर सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे. 18 जुलै 2019 मध्ये आर्थिक निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर वारंवार कंपनीने महापालिकेकडे वॅर्कऑर्डर मिळावी, यासाठीचा पाठपुरावा केला.

मात्र महापालिकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तांत्रिक आणि आर्थिक निकषात बसत असून महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल जपान दूतावासाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने काम करावयास हवे, त्या पद्धतीने काम होत नाही याबाबतची समज पुणे महापालिकेला द्यावी, असे जपान दूतावासाने जलशक्ती मंत्रालयाला पत्राद्वारे कळविले आहे. तसेच या प्रकल्पावर जपान दूतावासाचे बारकाईने लक्ष असून हा प्रकल्प मार्गी कसे लागेल, यासाठी महापालिका आयुक्तांनी त्यामध्ये जातीने लक्ष घालावे, अशी सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. या पत्राची प्रत जपान दूतावासाने महापालिकेला देखील पाठविली आहे. 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तोशिबा वॉटर सोल्यूशन या कंपनीला भैरोबा नाला येथे 75 एमएलडी क्षमतेचे तर डॉ. नायडू रुग्णालयाच्या परिसरात 127 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मिती देखील केली जाणार आहे. त्या कंपनीला महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचे जपान दूतावासाने पत्रात म्हटले आहे. यावरून महापालिकेच्या कामकाज कशा प्रकारे चालते यावर प्रकाश पडला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.