पुणे : कधी आपला फोटो झकास येण्यासाठी, तर कधी मोबाईल सतत 'क्लीन' राहण्यासाठी, अशा कुठल्या ना कुठल्या कारणासाठी, आपण आपल्या मोबाईलमध्ये वैविध्यपूर्ण ऍप (App) डाऊनलोड करतो, पण त्याच ऍपमागून छुप्या पद्धतीने एखादा व्हायरस (Virus) आला आणि त्याने तुम्हाला आर्थिक झळ बसविली तर? होय, 'जोकर' हा मालवेअर व्हायरस हा त्यापैकीच एक व्हायरस आहे. जो तुमच्या मोबाईल ऍपमध्ये छुप्या पद्धतीने राहून तुमची गोपनीय माहिती मिळवून आर्थिक फसवणूक करू शकतो.
नागरिकांना विशेषतः तरुणांना आपल्या महागड्या ऍन्ड्रॉईड (Android) फोनमध्ये विविध प्रकारचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची भारी हौस असते. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीकडून त्या ऍपचा वापर होतोय, म्हणून मग आपणही त्यांच्या पद्धतीनेच कॅमेरा, क्लीनर, मेसेज संबंधीचे एखादे मोबाईल ऍप्लिकेशन सुरक्षित गुगल प्ले स्टोअरमधून झटकन डाऊनलोड करण्यास प्राधान्य देतो. परंतु प्ले स्टोअरमधीलच काही ऍपमधून 'जोकर' हा मालवेअर व्हायरस नागरिकांची गोपनीय माहिती घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याच्या घटना घडल्या आहेत.
भारतासह जगभरातील ३६ देशांमधील नागरिकांना त्यांनी डाऊनलोड केलेल्या ऍपमुळे काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याच्या तक्रारी संबंधित कंपनीला केल्या होत्या. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल ऍपमध्ये पेरलेला हा व्हायरस नागरिकांच्या डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगच्या व्यवहारावर लक्ष ठेवतो. त्यानंतर त्यांना 'प्रीमियम सब्सक्रिप्शन'च्या नावाखाली मेसेज पाठवून सायबर गुन्हेगार पैसे काढत असल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, या व्हायरसचा फटका भारतासह अनेक देशातील नागरिकांना बसत असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरमधील २४ ऍप काढून टाकले आहेत.
असा तपासा तुमच्या मोबाईलमधील 'व्हायरस'
प्ले स्टोअरमध्ये जाऊन 'प्ले प्रोटेक्ट' बटणावर जाऊन स्कॅन करा. मोबाईलमध्ये जर अनावश्यक ऍप किंवा व्हायरस असल्यास तो स्कॅनद्वारे काढून टाकला जाईल.
अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी
- अनावश्यक मोबाईल ऍप डाऊनलोड करु नका.
- संशयास्पद मोबाईल ऍप तत्काळ अन-इन्स्टॉल करा.
- तुमच्या परवानगीशिवाय मोबाईलमधून आर्थिक व्यवहार झाला नाही, याची खात्री करा.
- गुगल प्ले स्टोअरमधून काढलेल्या त्या 24 ऍपला चुकूनही डाऊनलोड करु नका.
- संशयास्पद ऍप डिलीट केल्यानंतर मोबाईलमधील डेटाचा सुरक्षित बॅकअप ठेवा.
- क्लीनर, बूस्टर, कॅमेराबाबतचे ऍप काढून टाका.
''अनधिकृत मोबाईल ऍप डाऊनलोड केल्याने जोकरसारखा व्हायरस नागरिकांची आर्थिक फसवणूक करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी देखील अधिकृत आणि मान्यताप्राप्त ऍप डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्यावे.''
- ऍड.योगेश पिंगळे, सायबर तज्ज्ञ
''मोबाईल ऍपमध्ये असणाऱ्या जोकर या मालवेअर व्हायरसमुळे पुण्यात नागरिकांची फसवणूक झाल्याची एकही तक्रार नाही. तरीही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये अनावश्यक ऍप डाऊनलोड करण्याचे टाळावे.''
- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
'दिल्लीमध्ये राहणाऱ्या माझ्या एका मित्राच्या मोबाईलच्या ऍपमध्ये जोकर व्हायरस आढळला होता. संबंधित व्हायरसच्या माध्यमातून मित्राच्या नेट बॅंकिंगची गोपनीय माहिती घेऊन त्याच्या बॅंक खात्यातील ५ हजाराची रक्कम काढण्यात आली होती. त्याने शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.''
- विजय शर्मा, नोकरदार.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.