Pune News : बुधवार पेठेतील श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोरील जुन्या वाड्याला लागलेल्या आगीत ट्रॉफी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मंदिराजवळ गल्लीत अनेक दुकाने आहेत. येथील सूर्यकुमार देवरूखकर यांच्या वाड्याला दुपारी अचानक आग लागली. या वाड्यात कुणीही राहात नव्हते. परंतु या वाड्यातील खोल्यांमध्ये बक्षीसे, लाकडी आणि पितळेच्या ट्रॉफी मोठ्या प्रमाणावर होत्या.
आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या कसबा मध्यवर्ती केंद्र आणि एरंडवणा केंद्रातून तीन बंब आणि पाण्याचे तीन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळा येत होता.
जवानांनी प्रयत्न करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. परंतु सायंकाळी सहा वाजेपर्यंत आग धुमसत होती. मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने वाड्याचा काही भाग पाडण्यात आला. जवानांनी पुन्हा पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड, फायर स्टेशन अधिकारी कमलेश चौधरी, पंकज जगताप, पोलिस उपनिरीक्षक संतोष मोरे, तसेच फायरमन संजय गायकवाड, समीर शेख, सतीश ढमाले,
समीर दळवी, मयूर देशमुख, सुमीत खरात, शफीक सय्यद, अनंत जाधव, सचिन अहिवळे, शरद गोडसे, शैलेश दवणे, आशुतोष पिंगळे, कमलेश माने आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
वाड्यातील देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती होती. ‘गणपती बाप्पाला बाहेर आणा’ अशी विनंती करण्यात आली. जवानांनी आग काही प्रमाणात आटोक्यात आल्यावर मूर्ती सुरक्षितपणे बाहेर आणली. देवरूखकर कुटुंबीय काही ट्रॉफी वाचतील, यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु ट्रॉफी आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.