Kalyani Nagar Accident : चालकाला धमकावणे भोवले;अल्पवयीन आजोबांसह वडिलांवर गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यानंतर आजोबा सुरेंद्रकुमार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी मोटारचालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत सुरेंद्रकुमार यांना गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २५) सकाळी अटक केली.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentsakal
Updated on

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यानंतर आजोबा सुरेंद्रकुमार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी मोटारचालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत सुरेंद्रकुमार यांना गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २५) सकाळी अटक केली. या प्रकरणी आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून सुरेंद्रकुमार (वय ७७) यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली. अल्पवयीन मुलाला मोटर चालवण्याची परवानगी दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने विशाल यांची शुक्रवारी (ता. २४) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

अग्रवाल कुटुंबीयांच्या वडगावशेरीतील बंगल्यात चालकावर दबाव आणल्याने व सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त (एक) सुनील तांबे तपास करणार आहेत.

कोणाशी बोललास तर याद राख

हेरीक्रुब यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, ‘येरवडा पोलिस ठाण्यातून मी माझ्या घरी जात होतो. पोलिस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर सुरेंद्रकुमार सरांनी मला बोलावून घेतले. मला धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडील बीएमडब्ल्यू गाडीत बसवून ब्रह्मा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात नेले. सुरेंद्रकुमार व विशाल यांनी संगनमत करून मला धमकावून माझा मोबाईल फोन काढून घेऊन त्यांच्या बंगल्यात बेकायदेशीर लपवून ठेवण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले. मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व या बाबत कुणाशी बोललास तर याद राख, अशी धमकीही त्यांनी दिली.’

काही मागणी असेल तर पूर्ण करू

अपघातानंतर विशाल यांचा मोटारचालक मानसिक तणावात होता. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. अपघाताचा आरोप स्वत:वर घ्यावा. त्याबदल्यात चांगले बक्षीस देऊन. तुझी काही मागणी असेल तर ती पूर्ण करू, असे आमिष त्यांनी दाखविले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या प्रकरणात कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे यांच्यासह सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले आहे.

घटनेच्याच दिवशी अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने जमीन मंजूर केला होता. मात्र त्यानंतर बुधवारी (ता. २२) मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. वडिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. तर आजोबा पोलिस कोठडीत आहेत.

बंगल्यात पंचनामा

पोलिसांनी शनिवारी अग्रवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकून तेथे पंचनामा केला. चालक गंगाधर यांना कोणत्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते, त्यांनी वापरलेला गणवेश बंगल्यात ठेवण्यात आला आहे का तसेच त्यांना कोणत्या वाहनातून बंगल्यात आणले, यादृष्टीने तपास करण्यात येईल.

मोटारीतील मुलांकडे चौकशी

अपघात घडला त्यावेळी अग्रवाल यांच्या मुलाचे दोन मित्र आणि मोटारचालक मोटारीत गंगाधर होता. पोलिस त्या अल्पवयीन मुलांच्या पोलिस संपर्कात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला. अल्पवयीन असल्याने त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविलेले नाही, मात्र पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. मोटार गंगाधर चालवीत असल्याचा बनाव अग्रवाल यांनी अपघातानंतर रचला होता. मोटारीत आणखी कोण होते हे सीसीटीव्ही चित्रीकरणावरून तपासण्यात येत आहे. तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

मुलाचा मोटारचालकाशी वाद

अल्पवयीन मुलाला आजोबा सुरेंद्रकुमार यांनी मोटारीची चावी आणि क्रेडीट कार्ड दिले होते. नातवाला चावी दिल्यानंतर असा काही प्रकार घडेल, याचा विचार केला नसल्याचे सुरेंद्रकुमार यांनी पोलिसांना सांगितले. नातवाने मित्रांसह कोझी आणि ब्लॅक पबमध्ये पार्टी केली. रविवारी मध्यरात्री मद्यप्राशन केल्यानंतर नातवाने मोटार चालविण्याचा हट्ट धरला. त्याने मोटारचालकाशी वाद घातला आणि वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी विशाल यांनी गंगाधर यांना सूचना केली की, तू मुलाच्या शेजारी बस. त्याला मोटार चालवू दे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.