Devendra Fadnavis : ‘बाल हक्क’चा आदेश धक्कादायक; वरिष्ठ न्यायालयात मागणार दाद

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय हक्क मंडळाचा आदेश धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय हक्क मंडळाचा आदेश धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. कायद्यातील नवीन तरतुदींनुसार या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. याबाबत बाल न्यायाधिकरणाने फेरविचार न केल्यास वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ही घटना गंभीर असून, दोषी असलेल्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

पुण्यातील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या घटनेची गंभीर दखल घेत फडणवीस मंगळवारी सायंकाळी थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी या घटनेत ३०४ कलम लावले आहे. ३०४ (अ) कलम लावलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी प्रारंभीच कठोर भूमिका घेतली. या गुन्ह्यातील मुलगा १७ वर्षे आठ महिन्यांचा आहे.

निर्भया प्रकरणानंतर कायद्यात झालेल्या बदलानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलालाही सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी अर्जात नमूद केले आहे. मात्र बाल न्याय हक्क मंडळाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला असून, न्यायालयाने त्याची दखल घेतली.

कायद्यानुसार, बाल न्याय हक्क मंडळाच्या आदेशाबाबत फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते. त्यांनी फेरविचार न केल्यास वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता बाल न्याय हक्क मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे.’’

अटींचे उल्लंघन करणारे बार बंद करणार

दारू पिऊन लोकांचे जीव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने देण्यात आले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. अटींचे पालन न करणारे बार बंद करण्यात येतील.

शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करावे. नाकाबंदी करून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरोधी मोहीम नियमितपणे राबवावी, याचेही निर्देश दिले आहेत. पालकांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल.

...तर पोलिसांवरही कारवाई

योग्य वेळी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार न्यायालयात जाण्यापूर्वी आरोपीविरुद्ध ३०४ कलम लावण्यात आले आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिसांकडून वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विशाल अग्रवालसह तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर - पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार चालवत दोघांना धडक दिल्याप्रकरणी या मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने येथे ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबरच त्यांचा चालक आणि आणखी एकाला ‘जेपी इंटरनॅशनल’ या हॉटेलमधून पोलिसांनी पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अग्रवाल फरारी झाले होते. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

ब्रह्मा ग्रुपच्या विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून भरधाव वेगाने मोटार चालवीत कल्याणीनगर भागात दोघांना उडविले होते. या अपघातात अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विशाल अग्रवालसह त्याच्या अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर या चौघांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच विशाल अग्रवाल सोमवारी सायंकाळी फरार झाले होते. ते छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती पुणे पोलिसांनी संभाजीनगरच्या गुन्हे शाखेला दिली होती.

पुणे पोलिसांनी अग्रवाल यांच्या मोटारीच्या जीपीएस ट्रॅकरचा माग काढला होता. त्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेने नारळीबाग येथील जे. पी. इंटरनॅशनल हॉटेल गाठले. येथून त्यांचा मित्र राकेश भास्कर पौडवाल (वय ५१, रा. नटराज रेसिडेन्सी, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) आणि चालक चत्रभूज बाबासाहेब डोळस (वय ३४, रा. गुंडी गाव, ता. सेलू, जि.परभणी, ह. मु. वडगाव शेरी, पुणे) यांना ताब्यात घेतले.

चालकाने मालक अग्रवाल यांना रेल्वेस्टेशन रोडवर आरटीओ कार्यालयाजवळील जेएम प्लाझा येथे सोडल्याची माहिती दिली. या हॉटेलवरून विशाल सुरेंद्र अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिन्ही आरोपींना पुणे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com