काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा माल ग्रामस्थांनी पकडला; ५१ पोती धान्यासह टेम्पो केला जप्त

Kanjale_Villagers
Kanjale_Villagers
Updated on

नसरापूर (पुणे) : कांजळे (ता.भोर) येथील रेशनिंग दुकानामधील गहू आणि तांदळाची ५१ पोती काळ्या बाजारात टेम्पोद्वारे नेत असताना ग्रामस्थांनी तो टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. येथील रेशनिंग दुकान (Rationing Shop) चालवणाऱ्या बचत गटाच्या महिला आणि खरेदी करणाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांजळे येथे श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या वतीने रेशनिंगचे दुकान चालवले जाते. गटाच्या सदस्य असलेल्या अनुसया बबन जाधव आणि नंदा सुरेश कामठे या हे दुकान चालवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेशनिंगचे धान्य योग्य प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी दाखल केली होती. मात्र, त्यामध्ये सुधारणा होत नव्हती. दरम्यान ग्रामस्थांनी रेशनिंगचे धान्य भरून विक्रीसाठी चालवलेले पिकअप गावामध्येच पकडल्याने येथे मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता हे स्पष्ट झाले आहे.

राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता.१३) ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रेशनिंग दुकान चालक अनुसया जाधव आणि नंदा कामठे (दोघीही रा. कांजळे, ता. भोर) यांच्याकडून ३९ गव्हाची आणि १२ तांदळाची प्रत्येकी ५० किलोची पोती एवढा रेशनिंगचा माल नरेंद्र जयंतीलाल मोदी (रा. किकवी, ता. भोर) यांना विकला होता. मोदी यांनी बेकायदेशीररित्या काळ्या बाजाराच्या दराने खरेदी करून त्याची खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी हा सर्व माल दुसऱ्या पोत्यांमध्ये भरून पिकअप टेम्पो (क्र.एम एच ११ बी एल ४८४५) मधून वाहतूक करून नेत असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि त्यांनी टेम्पोसहीत हा सर्व माल पकडला.

या प्रकरणी भोरचे पुरवठा निरीक्षक प्रशांत ओहोळ यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार टेम्पो चालक सिध्देश्वर सुरेश रोकडे (रा. गोपाळपेठ, सातारा), खरेदीदार नरेंद्र मोदी (रा. किकवी) आणि रेशनिंग मालाची विक्री करणाऱ्या नंदा कामठे आणि अनुसया जाधव यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून रोकडे आणि मोदी यांना अटक करण्यात आली आहे.

धान्य नेणाऱ्या टेम्पोला पकडताना भोर तालुका भाजपाचे अध्यक्ष जीवन कोंडे, कांजळेचे पोलिस पाटील दादासो भगत, माजी सरपंच प्रकाश जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव जाधव, बाळासाहेब गायकवाड, रवी गायकवाड, केशव जाधव, संजय जाधव, दत्तात्रय तांबट, बापू पोळेकर, बाळासो उर्फ मिथून जाधव, विकास गाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

जीवन कोंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गोरगरीब जनतेच्या तोंडचा घास पळवणाऱ्या या प्रवृत्तीला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे, यामधील दोषींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला या बदद्ल त्यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()