Katraj News : कात्रज उड्डाणपूल अडकला समस्येच्या गर्तेत

कात्रज चौकातील उड्डाणपूल याठिकाणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी होत असला तरी सद्यस्थितीत तो समस्येच्या गर्तेत अडकला आहे.
Katraj Chowk Flyover
Katraj Chowk Flyoversakal
Updated on

कात्रज - कात्रज चौकातील उड्डाणपूल याठिकाणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी होत असला तरी सद्यस्थितीत तो समस्येच्या गर्तेत अडकला आहे. उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला या समस्यांची कोंडी फोडून काम पुढे घेऊन जाण्यासाठी महापालिका, पीएमपी आणि वाहतूक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम मुख्य चौकात आले आहे. हे काम करण्यासाठी वाहतूक वळविणे गरजेचे असून वाहतुकीला पर्यायी व्यवस्था नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्गाकडून वाहतूक वळविण्याची दोनवेळा चाचण्या घेतल्यानंतर आता त्यांच्याकडून त्रुटीवर अभ्यास सुरु आहे. दोन्ही चाचण्यांच्या वेळी आढळून आलेल्या त्रुटींवर काम करुन लवकरच पुढील काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून देण्यात आली आहे.

उड्डाणपुलाच्या कामाची मुदत फेब्रुवारी २०२४मध्ये संपल्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२४पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, विविध अडचणींचा सामना करत असताना सदर उड्डाणपुलाचे काम डिसेंबरमध्येही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सदर अडचणींवर मात करत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

वाहतूक वळविण्यासाठी या उपाययोजनांची गरज

- उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची गरज

- कात्रज चौकातील वादात असलेल्या जागांचे भूसंपादन महापालिकेकडून युद्धपातळीवर करणे

- चौक, पर्यायी रस्ते आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणारी अतिक्रमणे हटविणे

- सातारा रस्त्यावरून स्वारगेटला आणि स्वारगेटवरून सातारामार्गे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस काही काळासाठी नवलेपूलमार्गे वळविणे

- बहुसंख्य पीएमपी बसेस कात्रज चौकात न येऊ देता विभाजन करुन मोरेबाग, कात्रज डेअरी, कात्रज डेपो परिसरातून परत वळविणे

- नवलेपुलाकडून स्वारगेट परिसरात जाणारी वाहने वंडरसिटी कात्रज डेअरीमार्गे वळविणे

- सातारा रस्ता परिसरातून कोंढव्याकडे जाणारी वाहने गुजरवाडी फाट्यावरून वळविणे

- साताऱ्याकडून येणारी स्वारगेटच्या बाजूला येणारी सर्व वाहने कात्रज घाटातून चौकात न येऊ देता नवलेपूलमार्गे वळविणे

प्रतिक्रिया

दोनवेळा प्रोयोगिक तत्वावर वाहतूक वळवून पाहिले आहे. यावेळी विविध शक्यतांची चाचपणी करण्यात आली आहे. या तपासणीनंतर विविध शक्यता समोर आल्याने काय उपायोजना करायला हव्यात याचा अंदाज आता आला आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आम्ही आणखी एक चाचणी घेऊ, त्यानंतर पुलाचे पुढील काम सुरु करण्यात येईल. एवढ्या वाहतूककोंडीत काम करणे हे आव्हानात्मक असून यासाठी आम्हाला सामान्य नागरिकांसह सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

चौकात रस्ता रुंदीकरणाअभावी प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. उड्डाणपुल झाल्याशिवाय कोंडी फुटणार नाही. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून कामाला गती देऊन काम पुर्ण करुन आमची या कोंडीतून सुटका करावी अशी अपेक्षा आहे.

- बाळासाहेब गदळे, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.