Katraj Hill : कात्रजला टेकड्यांची लचकेतोड!

पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या अत्यंत जवळच्या मोठ्या शहरांपैकी पुणे हे एक महत्त्वाचं शहर आहे.
Katraj Hill
Katraj HillSakal
Updated on
Summary

पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या अत्यंत जवळच्या मोठ्या शहरांपैकी पुणे हे एक महत्त्वाचं शहर आहे.

पुणे - देशाने बरोबर ३१ वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे पुण्याच्या विकासाचा निश्चित गती मिळाली. मात्र, या गतीला दिशा मिळाली नाही. त्याला नियोजनाची जोड नव्हतीच आणि त्यावर नियंत्रणही नव्हते. त्याचा दुष्परिणाम आता पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रजच्या टेकडीवर दृश्‍य स्वरूपात स्पष्टपणे दिसतो.

पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या अत्यंत जवळच्या मोठ्या शहरांपैकी पुणे हे एक महत्त्वाचं शहर आहे. शहरातील एकूण क्षेत्रफळापैकी १२२५ हेक्टर क्षेत्र (५.१० टक्के) ११ टेकड्या आणि त्यावरील उतारांनी व्यापले आहे. त्यात कात्रज टेकडीचा समावेश होतो. नवीन आर्थिक धोरणामुळे पुण्यात उद्योग आले. कामासाठी स्थलांतरित कामगार आले. लोकसंख्या वाढली. त्याचे थेट परिणाम कात्रजच्या टेकडीवर झाल्याचे दिसते.

तीस वर्षांमध्ये काय झाले?

  • नव्वदच्या दशकात या भागात नवीन उद्योग सुरू झाले. त्यातून शहरीकरणाला सुरवात झाली.

  • या भागातील लोकसंख्या वाढली. त्यामुळे बांधकाम वाढले. पुण्यात २००१ मध्ये बांधकामाचे क्षेत्र ५४.०३ टक्के होते. ते २०२० मध्ये ६३.८४ टक्क्यांपर्यंत वाढले. याचेच प्रतिबिंब कात्रज टेकडीवर दिसते.

  • या भागात आता वणवे लागण्याचे प्रमाण वाढले. त्यातून जैवविविधता धोक्यात आली.

  • कचऱ्याची समस्या वाढली. कात्रज टेकडी म्हणजे शहराचा कचरा टाकण्याचे ठिकाण झाले.

  • या कचऱ्याला आग लावल्याने त्यातून परिसरात धूर वाढला आणि हवेची गुणवत्ता ढासळली.

  • मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागले. यातून टेकडीच्या जैवविविधतेचे सर्वाधिक नुकसान झाले.

टेकडी कुठे आहे?

  • पुण्याहून कात्रजमार्गे सातारकडे जाणारा रस्ता या टेकडीवरून जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार १०० मीटर उंचीवर आहे.

  • इतिहास काय आहे?

  • कात्रज टेकडीला प्राचीन काळापासून समृद्ध इतिहास आहे. बाराव्या आणि तेराव्या शतकात राज्य केलेल्या यादव राजवंशाचा हा एक भाग होता.

  • मोगल बादशहा औरंगाजेबाने सतराव्या शतकात ही टेकडी ताब्यात घेऊन तेथे किल्ला बांधला होता. पुढे इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी तो उद्‍ध्वस्त केल्याची नोंद इतिहासात आहे.

वैशिष्ट्ये कोणती?

  • कात्रज टेकडी ही पर्यटकांसाठी आकर्षण आहे

  • सायकलिंग आणि गिर्यारोहक येथे सराव करतात

  • पक्षिनिरीक्षक येथे येतात

  • टेकडीवर वेगवेगळ्या ६०१ वनस्पतींच्या प्रजातींची नोंद

  • या प्रदेशात आढळणाऱ्या ३० दुर्मीळ वनस्पती येथे आहेत

काय केले पाहिजे?

  • कात्रज टेकडीच्या संरक्षणासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे.

  • वनीकरणाची मोहीम राबविण्याची नितांत गरज आहे.

  • प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पतींच्या प्रजातींचा लागवड करावी.

  • प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा

  • कचरा व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता

भेडसावणारे प्रश्‍न

  • जंगलतोड आणि अतिक्रमण : या टेकडीवर बेसुमार वृक्षतोड करून तेथे इमारती बांधण्यात आल्या. टेकड्या फोडून त्यावर अतिक्रमण करण्यात आले.

  • मातीची धूप : जंगलतोड झाल्याने जमिनीवरील मातीची मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचे धोके वाढले वाढले आहेत.

  • जैवसंपत्ती धोक्यात : टेकडीवरील मानवी हस्तक्षेपामुळे हवा आणि पाणी प्रदूषित झाले आहे. या भागातील पक्षी, प्राणी आणि दुर्मीळ वनस्पतींचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले आहेत.

  • समतोल ढासळतोय : पर्यावरणामध्ये जैवसाखळीचा समतोल महत्त्वाचा असतो. हा समतोल ढासळत असल्याने स्थानिक दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी वेगाने नष्ट होऊन जैवसाखळीचा समतोल ढासळत असल्याचे दिसते.

  • हवामान बदल : हवामान बदलामुळे पर्जन्यमान, उन्हाळा यात बदल झाले आहेत. याचा टेकडीवर होणारा परिणाम आता जाणवत आहे.

गीतेतील आठव्या अध्यायात ‘मरणाचे स्मरण असावे’ यावर विवेचन करताना विनोबा भावे यांनी एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगितली आहे. एक गृहस्थाने नाथास विचारले, ‘महाराज, आपले जीवन किती साधे, किती निष्पाप, आमचे असे का नाही? नाथ म्हणाले, ‘माझी गोष्ट तूर्त राहू दे. तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळली आहे. तुझे आजपासून सात दिवसांनी मरण आहे.’ तो मनुष्य घाईने घरी गेला. त्याला काही सुचेना. निरनिराळ्या गोष्टी तो बोलत होता, करीत होता. तो आजारी झाला. अंथरुणावर होता. सातव्या दिवशी नाथ त्याच्याजवळ आले. नाथांनी त्याला विचारले, ‘या सहा दिवसांत किती पाप झाले? पापाचे किती विचार मनात आले?’ तो मनुष्य म्हणाला, ‘नाथा, पापाचा विचार करायला वेळच मिळाला नाही. डोळ्यांसमोर सारखे मरण होते.’ नाथ म्हणले, ‘मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असला म्हणजे पाप करावयास कसे सुचेल?’.... सांगायचे तात्पर्य टेकड्यांचे लचके तोडून, निसर्गाचा ऱ्हास करून आपण आपले मरण ओढवून घेत आहे, याची जाणीव मानवाला झाली तर एकनाथ महाराजांच्या वरील गोष्टीचे महत्त्व आपल्याला कळेल आणि टेकड्या वाचविण्यासाठी आपल्या हातून काही तरी प्रयत्न होईल. याबाबत आपल्या भावना, सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.