देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीचे २०२१ हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणजे डॉ. य. दि. फडकेलिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन. मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रकाशनाचा कार्यक्रम होत आहे. या पुस्तकाला शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली असून, तिचा हा संपादित अंश...
रोहिड खोऱ्यातील भोर तरफचे देशमुख कान्होजी जेधे यांनी प्रतापगडाच्या लढाईपूर्वी अफझलखानाने पाठवलेले आदिलशाहाचे शाही फर्मान धुडकावले; त्यांनी मुलाबाळांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर बेलरोटीवर हात ठेवून एकनिष्ठतेची शपथ घेतली आणि वतनावर पाणी सोडले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत हिंदवी स्वराज्य आकाराला येत असताना त्याला दोन्ही हातांनी आधार देण्याचे काम ज्या जेधेंनी केलं, त्याच गौरवशाली घराण्याचा वारसा लाभला केशवराव जेधेंना! जेधेंच्या पुणे शाखेत जन्मलेल्या केशवराव जेधेंनी घराण्याची उज्ज्वल परंपरा पुढे नेली.
केशवरावांचे जीवनचरित्र य. दि. फडकेंच्या लेखणीने लिहिले गेले आहे, हीच खरी केशवरावांना आदरांजली आहे. य. दि. लिखित जीवनचरित्र हा त्या कालखंडाचा आरसा असणार हे मी जाणून होतो, त्यामुळे प्रस्तावनेची विनंती मी चटकन स्वीकारली. शिवाय केशवराव जेधे हे १९५७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून संसदेवर निवडून गेले होते. त्यांच्या चरित्रग्रंथाला माझी प्रस्तावना असावी, हा विलक्षण योग आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे अनेक विचार-आचारांच्या मंथनाचे, अभिसरणाचे केंद्र आहे. या शहराचा इतिहास पाहिला तर पुण्यात ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन मुख्य समाजप्रवाह निर्माण होण्याचे कारण समजेल. पुण्याच्या जहागिरीतून शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभारले आणि याच पुण्यातून पेशवाईच्या माध्यमातून मराठा साम्राज्याची सूत्रे हलवली गेली. लाल महालात आणि शनिवारवाड्यात एक ठरावीक अंतर राहिले, तरी मुठेचे दुथडी भरलेले, तर कधी जमिनीत खोल मुरलेले स्वातंत्र्याभिमानी पाणी या दोन समाजप्रवाहांना फार तोडूनही देत नव्हते. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांनी सब्राह्मण अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य घडविण्याचा जो चमत्कार साधला, तो शिवोत्तर काळात कुणालाही जमला नाही. ही अंतर्मुख करणारी शोकांतिका आहे. ते जमले असते तर देशाची राजकीय सूत्रे महाराष्ट्राबाहेर कधीच गेली नसती. पुस्तक सावकाश आणि सावधपणे वाचावे, वाचकाच्या मनःपटलावर ही भावना जरूर उमटेल.
मैत्रीचे तीन अध्याय
केशवरावांच्या जीवनचरित्रात मला मैत्रीची तीन पर्वं दिसतात. पहिले जेधे-जवळकर, दुसरे जेधे-गाडगीळ आणि तिसरे जेधे-मोरे अशा विभागणीत त्यांचे चरित्र साकारते. पहिल्या पर्वात ब्राह्मण-ब्राह्मणेतर धुमश्चक्री पाहावयास मिळते. या पर्वात नेतेमंडळींचा प्रगल्भपणा अजिबात दिसत नाही तर केवळ प्रक्षुब्धपणा दिसतो. जवळकरांच्या जळजळीत लेखणीने इतकी आग ओकली आहे की, तिचा वाचतानाही चटका बसतो. चरित्रात जेधेंची दलितांबद्दल भूमिका समजून घेताना बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या ठिणग्या आपले डोळे दिपवतील. बाबासाहेबांना ब्राह्मण त्याज्य नव्हते. मात्र ब्राह्मण्यवादी ब्राह्मणांना त्यांचा प्रखर विरोध असे. अनंत विनायक चित्रे, गंगाधरपंत सहस्रबुद्धे, टिपणीस असे पुरोगामी ब्राह्मण सहकारी चवदार तळ्याच्या सत्याग्रहात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. या घटनांचे केशवराव जेधे साक्षीदार होते. मनुस्मृती जाळली, याचे केशवरावांनी अभिनंदन केले. प्रारंभी केशवरावांवर जवळकरांचा प्रभाव असला तरी त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. जेधेंना विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांच्या अस्पृश्योद्धारक कार्याविषयी आदर होता. शैक्षणिक कार्यातदेखील ते मागे नव्हते. जेधे मॅन्शनमधून श्री शिवाजी मराठा सोसायटी, अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषद वगैरे संस्थांच्या शिक्षणप्रसार कार्याकडे सातत्याने लक्ष दिले गेले. केशवरावांची कारकीर्द नंतरच्या पर्वात अधिक संतुलित झाली. प्रौढत्वाच्या वाटचालीत केशवराव हळूहळू महात्मा गांधीजींच्या विचारांकडे खेचले गेले. गांधीजींचे नेतृत्व आसेतू हिमाचल का स्वीकारले गेले, याचे थोडक्यात गमक या चरित्रात आढळते. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक तिन्ही प्रांतांतील प्रगतीसाठी महात्मा गांधी पुढे होते. समाज आणि राजकारण या जोडीने राष्ट्राचा गाडा पुढे नेण्याचे धोरण गांधीजींनी स्वीकारले, हे इतर नेतृत्वांनी केले नाही, त्यामुळे गांधी महात्मा झाले. असे बारकावे या चरित्रात टिपले गेले आहेत.
केशवरावांनी ब्राह्मणेतर चळवळीचा विरोध पत्करून काँग्रेसचा रस्ता धरला आणि त्यांच्या कारकिर्दीचे दुसरे पर्व सुरू झाले. काकासाहेब गाडगिळांसारखा अभ्यासू-गुणी मित्र त्यांना लाभला. मध्यवर्ती कायदेमंडळापर्यंतचा राजकीय प्रवास वाचताना केशवरावांतील सद्वर्तन, तळमळ, करारीपणा यांचा प्रत्यय येईल. प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षाची वाढ केली, काँग्रेस खेड्यापाड्यात नेली. केशवराव घटना समितीचे सदस्यदेखील झाले. दुसरे पर्व हाच त्यांच्या कारकीर्दीचा उच्चबिंदू होता.
केशवराव जरी नावाजलेल्या उद्योग घराण्यातील होते, तरी त्यांना सामान्य शेतकरी-कामगारांबद्दल अधिक कणव होती. ही कणव पक्षांतर्गत शेतकरी-कामगार संघ स्थापनेपर्यंत घेऊन गेली. पुढे याचाच स्वतंत्र पक्ष झाला. केशवरावांना हे चुकलेले पाऊल किंवा भरकटलेले पाऊल वाटले. त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली; परंतु मला वाटते यात त्यांचे काही चुकले नाही. आजही महाराष्ट्रातील काही भागांवर पारंपरिक पकड असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची मुहूर्तमेढ त्यांच्या प्रयत्नाने रोवली गेली होती, हे त्यांचे यश म्हणावे लागेल; परंतु कारकीर्दीच्या शेवटी काकासाहेबांनी जेधेंना पुन्हा काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात परत आणले. या सगळ्या जीवनप्रवासाचे स्वतः केशवराव जेधेंनी प्रेमाताई कंटक यांच्याशी बोलताना स्वचरित्राच्या तीन अंकाविषयी अगदी नेमके वर्णन केले आहे. ‘पहिल्या अंकात सामाजिक अन्यायाविरुद्ध भांडलो, दुसऱ्या अंकात काकासाहेबांबरोबर स्वातंत्र्यासाठी झगडलो आणि तिसरा अंक शोकांतिका ठरला,’ असे ते वर्णन आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.