पुणे - ईटीएस मशिन, रोव्हर आणि ड्रोनच्या मदतीने खराडीतील ७०० हेक्टरवरील मिळकतींचे सर्वेक्षण, मोजणी आणि नकाशे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ते नकाशे आता महापालिकेकडे पाठविण्यात आले असून, खराडीतील महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, रस्ते यासह मोकळ्या जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून नकाशे प्राप्त झाल्यानंतर पुढील टप्प्यात मालकी हक्काची तपासणी करून मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, परंतु अशा शहरात मिळकतीचे सात-बारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्हीही सुरू आहेत; अथवा सिटी सर्व्हे झाले असूनदेखील सात-बारा उतारा सुरू आहे. त्यामुळे अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सात-बारा उताऱ्याचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकारदेखील वाढत आहेत.
त्यामुळे भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सात-बारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरी या गावामध्ये जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविण्यात आला.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता खराडी गावाची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या मान्यतेने भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. मात्र, यंदा रोव्हर, ईटीएस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार दोन महिन्यांत खराडीच्या ७०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार रोव्हर आणि ईटीएस मशिनचा वापर करून मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले होते.
खराडीचा काही भाग लोहगाव येथील विमानतळाच्या परिसरालगत असल्यामुळे ड्रोनची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सुमारे १०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम रखडले होते. त्याला मान्यता मिळाल्याने ते कामदेखील नुकतेच मार्गी लागले. त्यामुळे मोजणीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यांचे नकाशेही तयार करण्यात आले. ते अंतिम करण्यापूर्वी महापालिकेला पाठविण्यात आले आहेत.
महापालिकेकडून त्यांच्या मालकी हक्काचे रस्ते, मिळकती आणि मोकळ्या जागा निश्चित करून ते नकाशे आल्यानंतर सुनावणी घेऊन प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाणार आहे, असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.
प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय होणार?
प्रॉपर्टी कार्ड हे महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहेत. प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाचे वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. तसेच सदनिकेची खरेदी विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहेत. एकच सदनिका वेगवेगळ्या बॅंकांकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलून फसवणूक करण्याच्या प्रकारालादेखील आळा बसणार आहे.
सध्या काय आणि पुढे काय होणार?
खराडी गावठाण हद्दीत प्रॉपर्टी कार्ड
काही भागात सात-बारा उतारा
मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सात-बारा उतारा बंद होणार
सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
महापालिकेचा काय फायदा होणार?
मालकीच्या मिळकतींची हद्द निश्चित होणार
रस्त्यांचे क्षेत्र, लांबी, रुंदी यांची माहिती मिळणार
मिळकतींची संख्या निश्चित होणार
मिळकतकराच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत होणार
सरकारी जमिनींची माहिती जमा होणार
खराडी येथील मिळकतींचे सर्वेक्षण, मोजणी आणि नकाशा तयार करण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. ते नकाशे महापालिकेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून नकाशा प्राप्त झाल्यानंतर मालकी हक्काच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
- सूर्यकांत मोरे, जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.