Pune Crime News : खराडीत मद्यपींची खुलेआम ‘जत्रा’;पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कायदा व सुव्यवस्थेवरून टीका होत असतानाही पुणे पोलिसांनी अद्याप त्यातून धडा घेतलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे खराडी आणि वाघोली हद्दीवरील उबाळे नगर भागात रोज भरणारी हजारो मद्यपींची ‘जत्रा’! खराडीच्या आयटी कंपन्यांमधील पंचविशीच्या आतील युवकांना ‘टार्गेट’ करून ‘जत्रा’ भरवणारे अनेक अनधिकृत बार येथे खुलेआम व्यवसाय करीत आहेत.
Pune Crime News
Pune Crime News sakal
Updated on

वडगाव शेरी : कायदा व सुव्यवस्थेवरून टीका होत असतानाही पुणे पोलिसांनी अद्याप त्यातून धडा घेतलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे खराडी आणि वाघोली हद्दीवरील उबाळे नगर भागात रोज भरणारी हजारो मद्यपींची ‘जत्रा’! खराडीच्या आयटी कंपन्यांमधील पंचविशीच्या आतील युवकांना ‘टार्गेट’ करून ‘जत्रा’ भरवणारे अनेक अनधिकृत बार येथे खुलेआम व्यवसाय करीत आहेत. महापालिका, पीएमआरडीए, राज्य उत्पादन शुल्क, वाघोली आणि चंदननगर पोलिस या विभागांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

नगर रस्त्यावरून इऑन फेज वन, इऑन फेज टू आणि गेरा बारकलेज आयटी पार्क परिसरात शेकडो आयटी कंपन्या आहेत. तेथे देशभरातून आलेले हजारो युवक आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. या युवकांना असलेला चांगला पगार डोळ्यासमोर ठेवून कंपनी शेजारच्या मोकळ्या जागा भाड्याने घेऊन हॉटेल चालकांनी अनधिकृत दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

फिनिक्स शाळे शेजारील परिसर तसेच खराडी दर्गा आणि चौखिढाणी रस्त्यावर हे प्रकार सुरू आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी विद्युत रोषणाई करीत मोकळ्या जागेत मोठे शेड आणि लाकडी कोप्या उभारण्यात आल्या आहेत. कंपनीतून सुटल्यावर सायंकाळनंतर आयटी कंपनीतील युवक आणि परिसरातील मंडळी येथे दारू पिण्यासाठी येतात. या भागात दररोज मध्यरात्रीपर्यंत अनधिकृत बार सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘सकाळ’ने या भागात पाहणी केल्यानंतर दारू पिणारे बहुतांशी युवक हे २५ वर्षाच्या आतील असल्याचे आढळून आले. खराडीतील अधिकृत बारच्या तुलनेत येथे थोडी कमी दरात दारू आणि खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे युवक आकर्षित होतात. शिवाय येथे कमी वयावरून कोणीही अडवणूक करत नाही. त्यामुळे त्यांची संख्या वाढती आहे.

बिल दिले जाते भलतेच

ग्राहकाने या अनधिकृत बारमध्ये बिल मागितल्यावर त्याला दारू ऐवजी ‘स्पेशल डिश’ किंवा ‘स्पेशल ड्रिंक’ नावाने बिल दिले जाते. शासनाचा महसूल बुडवून अनधिकृत दारू विक्रेत्यांनी अशी पळवाट काढली आहे. त्यामुळे ग्राहकाला कोठेही तक्रार करता येत नाही.

अशी होते दारू विक्री

  • वाइन शॉपपेक्षा ३० ते ४० टक्के वाढीव दराने दारू विक्री

  • रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत दारू मिळते

  • वयाचा पुरावा कोणीही मागत नाही

  • दारू पिण्याचा परवाना कोणी पाहत नाही

  • दारू पिताना मोठ्या पडद्यावर क्रिकेट मॅच किंवा चित्रपट पाहण्याची सोय

  • आयटी कंपनीतील तरुण आणि तरुणी एकत्र आल्यास ‘प्रायव्हसी’ साठी लाकडी कोपी देतात

  • पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची भीती नाही

  • हॉटेलच्या बिलावर जीएसटी द्यावा लागत नाही

  • मद्यपींचा त्रास होत असल्याबाबत आमच्या सोसायटीने पोलिसांना पत्र दिले होते. मात्र चंदननगर पोलिसांनी काहीही केले नाही. त्यामुळे आम्ही सोसायटीबाहेर मद्यपींनी बसू नये, थांबू नये अशा आशयाचा फलक लावला आहे. रात्री शतपावली करायला बाहेर जायला भीती वाटते.

    - प्रिया शर्मा, स्थानिक नागरिक, खराडी

खराडीत उघड्यावर होणारी गांजा, दारू विक्री, पब, क्लब बंद व्हावेत. मोठ्या लोकांची अवैध धंद्यात भागीदारी आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तक्रार करूनही कारवाई होत नाही.

-प्रभा करपे, अध्यक्षा, रेसिडेंट वेल्फेअर, खराडी

खराडीतील आयटीमध्ये काम करणारा तरुण वर्ग कामावरून सुटल्यावर कधीही दारू प्यायला जातात. त्यातून अवैध दारू विक्री होत असेल. खराडीमध्ये अवैध दारू विकणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई केलेली आहे. परंतु तरीही असा प्रकार सुरू असेल तर पुन्हा कारवाई करू.

-विष्णू कौसाडीकर, निरीक्षक,

राज्य उत्पादन शुल्क विभाग

अवैध दारू विक्रीबाबत कारवाई कायम सुरू असते. आचारसंहितेच्या काळातही आम्ही कारवाई केलेली आहे.

-मनीषा पाटील, निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.