पुणे - कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख उपस्थित होते. रितेश कुमार म्हणाले, कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त अभिवादन सोहळ्यात गतवर्षी सुमारे १२ लाख अनुयायी सहभागी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनुयायांच्या संख्येत २५ टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे.
हा अभिवादन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण आयुक्त, ‘बार्टी’चे महासंचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात आल्या.
या सर्व विभागांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले आहे. अभिवादन सोहळ्यादिवशी पोलिसांकडून सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ शहर पोलिसांकडून सहा ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असेल पोलिस बंदोबस्त
पोलिस आयुक्त-१, पोलिस सहआयुक्त- १, अतिरिक्त आयुक्त- ४, पोलिस उपायुक्त- ११, सहायक आयुक्त- ४२, पोलिस निरीक्षक- ८६, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- २७१, पोलिस कर्मचारी- ३२००, होमगार्ड- ७००, राज्य राखीव पोलिस दल जवान ६००.
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई
सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सायबर गुन्हे शाखेकडून सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवरही बंदोबस्त
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.