पुणे - सोमवारी पहाटे 2.20 वाजताची वेळ. कोथरुडमधील (Kothrud) एका इमारतीत चोरटे दरोडा टाकत असल्याची बातमी पोलिसांना (Police) मिळाली. अवघ्या 5 मिनीटातच रात्रपाळीचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तिथे पोचले. पोलिसांनी (Police) अंधारातच आपापली "पोझिशन' घेतली. घरफोडी करुन हातात शस्त्र घेतलेले चोरटे जिन्याने खाली उतरत होते. तेवढ्यात पोलिसांनी चोरट्यांवर उडी घेतली. झटापटीत एकजण पोलिसांच्या तावडीत आला, तर अन्य पळाले. (Kothrud Police Thief Crime)
तरीही पोलिसांनी एकाचा पाठलाग सुरू केला. धावतानाच तो पोलिसांवर कोयता उगारत होता. तरीही पोलिस पिच्छा सोडत नव्हते. 300 मीटर अंतर पार करून त्याने सोसायटीच्या भिंतीवरुन उडी मारली, त्याच्या हातातील कोयता बाजुला पडला आणि पुन्हा जीवाची पर्वा न करता पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील नाही, तर कोथरुड पोलिसांनी सोमवारी पहाटे केलेली ही धाडसी कारवाई आहे. खुद्द पोलिस आयुक्तांनी कौतुक केले, तसेच त्यांना बक्षिसही जाहीर केले.
चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना घाबरून पोलिस पळाल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. संबंधीत पोलिसांना शिक्षा तर झालीच, त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी रात्रपाळीच्या व्यवस्थेत अमुलाग्र बदल करून पोलिस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर जबाबदारी टाकली होती. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता कोथरुडमधील राजा शिवराय प्रतिष्ठानजवळच्या पंचरत्न सोसायटीमध्ये चोरटे घरफोडी करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रपाळीचे पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके पाच ते 10 पोलिसांना पाच मिनीटात घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी सोसायटीचा वीजपुरवठा खंडीत केल्याने अंधार पसरला होता. त्यातही पोलिसांनी आपापल्या थांबण्याच्या जागा निश्चित केल्या. दरोडा टाकल्यानंतर सशस्त्र चोरटे जिन्याने खाली येऊ लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण पळाले. तर एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला.तर पळालेल्या एकाचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला. चोरटा पोलिसांवर कोयता उगारत होता. तरीही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याने पोलिसांना कोयता फेकून मारला. त्यानंतर चोरटा एका सोसायटीची भिंत ओलांडून पलिकडे जात असतानाच पोलिसांनी त्याच्या अंगावर उडी घेत त्यालाही ताब्यात घेतले. बल्लूसिंग प्रभुसिंग टाक, उजालासिंग प्रभुसिंग टाक (दोघेही रा.रामटेकडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पहाटेच्यावेळी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनाही हा प्रकार समजला. त्यांनीही थेट सायकलवरून पोलिस ठाणे गाठत आपल्या धीरोदत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. एवढेच नव्हे, तर खुद्द पोलिस आयुक्तांनीही कोथरुड पोलिस ठाण्यास सोमवारी सकाळी भेट देऊन पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना बक्षिसही जाहीर केले.
यांनी केली धाडसी कारवाई
पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर सांगुर्डे, पोलिस कर्मचारी वैभव शिंदे, मनोहर कुंभार, सुरज सपकाळ, होनाजी धादवड, विकास मरगळे, दत्ता चव्हाण, गणेश बाटे, बुरले, गजभारे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.