कागदी पुठ्ठ्यापासून दुचाकी, रेसिंग दुचाकी, मर्सिडीस कार, फेवरेट कंटेनर, ऑटो रिक्षा, मॉडेलिंग व्हिंटेज कार, स्पोर्ट्स कार, मॉन्स्टर जीप आणि कंटेनर अशा एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ५० गाड्या बनवल्या.
कॅन्टोन्मेंट - कागदी पुठ्ठ्यापासून (paper cardboard) दुचाकी, रेसिंग दुचाकी, मर्सिडीस कार, फेवरेट कंटेनर, ऑटो रिक्षा, मॉडेलिंग व्हिंटेज कार, स्पोर्ट्स कार, मॉन्स्टर जीप आणि कंटेनर अशा एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ५० गाड्या (Vehicles) वय वर्षे 11 असणाऱ्या कुणाल सुनील कोळी (Kunal Koli) या मुलाने बनविल्या आहेत.
कोंढवा बुद्रुक येथील श्री संत गाडगेमहाराज महापालिका शाळा क्र. ८२ (मराठी-जी) मधील सहावी इयत्तेत कुणाल शिक्षण घेत आहे. ही वाहने बनविण्यासाठी पाच ते दहा रुपये खर्च येत असून, तो मागिल सात वर्षांपासून वेगवेगळ्या गाड्या बनवत आहे. २०२० साली विज्ञान प्रदर्शनामध्येही त्याला त्या मांडण्याची संधी मिळाली.
कुणाल मूळचा चोपडा जि. जळगाव असून, सध्या शिवनेरीनगर, गल्ली क्र.१६, कोंढवा बु।। येथे आई व छोट्या बहिणीसोबत राहत आहे. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असून, आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. गावाकडे डीजेवरील नृत्य पाहिले आणि त्यातूनच आपणही असा प्रकारचे काही तरी वेगळे बनविले पाहिजे, असा निश्चय केला. शाळेत ये-जा करताना गॅरेजमध्ये दुचाकी-चारचाकीचे स्पेअरपार्ट जोडताना पाहत बारकाईने निरिक्षण केले. तेव्हापासून त्याच्या डोक्यात गाड्या बनविण्याचे खूळ होते. त्याच्या संकल्पनेला आई आणि शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले आणि त्याने कागदी पुठ्ठ्यापासून गाड्या बनविण्यास सुरुवात केली. फक्त गाड्या बनवून तो थांबला नाही, तर त्या सुरक्षित ठेवण्यासाठी कागदी पुठ्ठ्यांचेच मोठे मॉडेल बनवले.
कंटेनरला विद्युत दिव्यांची व्यवस्था, प्रत्येक वाहनाचे इंजिन आणि वायरिंग, चाके, आसन व्यवस्था, टफ, डिकी अशा सर्व बाबींची बारकाईने मांडणी केली आहे. एका दिवसांत एक कार बनविण्याचे तंत्र त्याने अवगत केले आहे. दूरचित्रवाणीवर "ओ माय गॉड" ही मालिका पाहत असून, त्यातूनही बरेच काही शिकता आले, असे त्याने सांगितले. त्याला चांगल्या पद्धतीने गाड्या बनविण्यासाठी स्केच डिझायनिंगचे मार्गदर्शन हवे आहे. त्याची कला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. खेळण्यातील गाड्यांची तोडफोड म्हणण्यापेक्षा तो गाड्यांचे पार्ट सुटे करून पुन्हा नव्या पद्धतीने जोडून नवीन तंत्रज्ञान अवगत करत आहे. इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या कुणालचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे.
श्री संत गाडगेमहाराज महापालिका शाळा क्र.८२ (मराठी-जी)च्या मुख्याध्यापिका भागिरथी खंडागळे आणि वर्गशिक्षिका सुनीता व्हावळ यांच्यासह सर्व शिक्षकांकडून मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे, असे त्याने आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.