Pune News
Pune Newssakal

Pune News : गर्भवतींच्या जिवाशी खेळ ; पोषण आहारातच आढळल्या अळ्या आणि किडे

गर्भवती महिलांचे व गर्भातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारातच अळ्या, किडे आढळल्याचा प्रकार आंबळे (ता. शिरूर) येथे उघडकीस आला. या घटनेचे समाजमाध्यमांवर पडसाद उमटले.
Published on

गुनाट : गर्भवती महिलांचे व गर्भातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारातच अळ्या, किडे आढळल्याचा प्रकार आंबळे (ता. शिरूर) येथे उघडकीस आला. या घटनेचे समाजमाध्यमांवर पडसाद उमटले.

या प्रकाराने खडबडून जागे झालेल्या महिला व बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पोषण आहारातील घटकांच्या नमुन्यांचा पंचनामा करत ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. दरम्यान, तपासणी अहवाल आल्यानंतरच आपण संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प समितीच्या अधिकारी निर्मला चोभे यांनी दिली.

आंबळे (ता. शिरूर) येथील पोषण आहाराच्या काजू, गुळ, खारिक, खोबरे आदी अन्नपदार्थांत आळ्या व कीटक असल्याचे फोटो समाजमाध्यमांत प्रसारित झाले होते. परिणामी आरोग्य विभागाकडून वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे ज्या लाभार्थीच्या पोषण आहारात अळ्या व किडे आढळले त्यांच्याकडून तो ताब्यात घेण्यात आला. अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना सोनवणे, अंगणवाडी सेविका सोनाली झेंडे, ग्रामस्थ व इतर लाभार्थी यांच्या साक्षीने तो आहार तपासून त्याचा पंचनामा करण्यात आला. नियमानुसार त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मीही या योजनेची लाभार्थी आहे. मला जो आहार अंगणवाडीतून मिळतो, तो व्यवस्थित आहे.

- समीक्षा पाडळे, लाभार्थी महिला

आंबळे येथील दोन गर्भवती महिलांना हा पोषण आहार देण्यात येतो. मात्र ज्या महिलेच्या आहारात अळ्या व किडे आढळले, त्यांनी तशी लेखी तक्रार केलेली नाही. आहार निकृष्ट दर्जाचा निघाल्यास तक्रारदाराने लेखी तक्रार करावी. त्यानंतर त्यातील सत्यता तपासण्यात येते. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात येतो. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या तपासणीनंतर या घटनेतील सत्यता बाहेर येईलच. या घटनेव्यतिरिक्त तालुक्यातून इतर कोणाचीही या आहाराबद्दल तक्रार नाही.

- निर्मला चोभे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.