बिबट्याची दहशत; आत्तापर्यंत सात जणांवर भरदिवसा हल्ला
घोडेगाव (ता. पुणे) : नारोडी (ता. आंबेगाव) येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत असून, नागरिक भयभीत आहेत. आतापर्यंत सात जणांवर भरदिवसा हल्ले झाले आहेत. परिसरात दोन ते तीन बिबटे व बछड्यांचा वावर असल्याने सायंकाळी सहानंतर नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरतात. वन विभागाकडून पिंजरा लावला जातो, पण त्यात बिबट्या अडकत नसल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नारोडी हद्दीतील चाफमळा वस्तीत शनिवारी माजी सरपंच अतुल नाईक यांच्या शेताच्या बांधावर बिबट्या 10 फुटांवर बसला होता. ट्रॅक्टर चालू असल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. याबाबत अतुल नाईक म्हणाले की, बिबट्याला पिंजरा लावला जातो; पण त्यात भक्ष्य ठेवले जात नाही. पिंजरा कोणत्या ठिकाणी लावावा, याबाबत वन विभागात एकमत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. महाजन यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थिनी आदिती हुले हिची रविवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याबाबत वनपाल बाळशिराम साबळे म्हणाले, ""नारोडीत दोन पिंजरे लावले आहेत. जनजागृती केली जात आहे. गस्तही घातली जात आहे. नागरिकांनी पिंजऱ्याच्या जवळ जाऊ नये. बिबट्याला पकडण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत.''
ग्रामस्थ गणेश वाघमारे व सोमनाथ कदम म्हणाले, ""पिंजरा लावायचा असेल, तर ट्रॅक्टर लोकांनी आणावा, अशी अपेक्षा वन विभागाची आहे. तसेच, भक्ष्य म्हणून शेळीही लोकांनीच द्यावी, असे असेल तर वनखात्याचे नेमके काम काय आहे?''
बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभाग उडवाउडवीची उत्तरे देत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मंगळवारी (ता. 26) सकाळी दहा वाजता या विषयावर चर्चा करण्यासाठी तातडीची ग्रामसभा बोलविण्यात आली आहे.
-अविनाश घोडेकर,
उपसरपंच, नारोडी (ता. आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.