प्रकाशन व्यवसाय मान टाकणार कात?

प्रकाशन व्यवसाय मान टाकणार कात?
Updated on

पुणे ः लॉकडॉऊनमुळे ग्रंथालये बंद.... पुस्तकांची दुकाने बंद.... परिणामी प्रकाशन व्यवसाय थंडावलेला.. अशी परिस्थिती असली तरी, हार न मानता पुस्तकांची निर्मिती करून ती वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी अनेक प्रकाशकांनी अभिनव मार्ग शोधले आहेत. घरपोच पुस्तके पाठविण्याबरोबरच आकर्षक सवलतींचीही खैरात त्यांनी सुरू केली आहे.

प्रकाशन संस्थांची कार्यालय बंद असल्यामुळे नव्या पुस्तकांची छपाईची प्रक्रिया बंद पडली अन पुस्तक विक्रीही. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पुस्तकांच्या पानांनाही कात्री लागली. ज्या घटकांवर प्रकाशन व्यवसाय अवलंबून आहे असे अक्षरजुळणीकार, कागद विक्रेते ,मुद्रणालये, बाइंडर, पुस्तक विक्रेते आणि वाचक हे घटक जेव्हा अडचणीत येतात तेव्हा प्रकाशन व्यवसाय थंडावतो. ही परिस्थिती किती काळ राहील, याची कल्पना नसल्याने अनेक प्रकाशन संस्थांनी ऑनलाइन पुस्तकांची विक्री सुरू केली. वाचकांनी ई-बुक चा पर्याय वापरला आणि आता तो वाढूही लागला आहे. मात्र, अजूनही एक वर्ग असा आहे की, तो पुस्तक हाताळूनच विकत घेतो. त्यामुळे ‘काऊंटर सेल’ही कायमच राहणार असल्याचे काही प्रकाशकांच मत आहे.

प्रकाशक अविनाश काळे म्हणाले, ‘‘वाचक दुकानांपर्यंत येत नाही म्हणून प्रकाशक वाचकांपर्यंत पोचू लागले आहेत. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीचाही पर्याय आहे. तसेच पुस्तके वाचकांच्या घरी पाठविली जातात. त्यातून वाचक त्यांना हवी असलेली पुस्तके निवडतात. या पद्धतीने आम्ही ४०० घरांपर्यंत पुस्तके पोचविली.’’ प्रकाशक मिलिंद परांजपे म्हणाले, ‘‘अनेक दर्जेदार पुस्तकांची किंमत या पूर्वी जास्त होती. परंतु, आता ती पुस्तके २५ ते ४० टक्के सवलतींमध्ये वाचकांना उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. प्रकाशक धनश्री बेडेकर म्हणाल्या, ‘‘भविष्यात पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यासाठी लेखक, प्रकाशक आणि दुकानदारांना तयारी करावी लागेल.’’

अनेक पुस्तके पीडीएफ स्वरूपात फॉरवर्ड केली जातात. त्यामुळे पुस्तक व्यवसायाचे नुकसान होते. त्यासाठी ग्रंथालयं आवश्यक आहेत. राज्य सरकारने ग्रंथालयांचे रखडलेले अनुदान नियमितपणे द्यायला हवे. त्यातून पुस्तके ग्रंथालयांपर्यंतच नव्हे तर वाचकांपर्यंही पोचतील.

राजीव बर्वे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ )

अशी आहे परिस्थिती

- लॉकडॉऊनमुळे पुस्तकांची विक्री कमालीची घटली आहे

- राज्यात दरमहा सुमारे २० ते २५ ठिकाणी पुस्तकांचे प्रदर्शन भरत असे, सध्या फक्त ६ ठिकाणी ते होते

- राज्यात १२६८७ वाचनालये आहेत परंतु त्यापैकी केवळ १५०० वाचनालये सध्या उघडी आहेत.

- सततच्या लॉकडॉऊनमुळे राज्यातील प्रकाशन व्यवसायला सुमारे ९० ते १०० कोटींचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.