- प्रसाद कानडे
पुणे - लोहगाव विमानतळाच्या सीमा भिंतीपासून चारही दिशांना १०० मीटरवरील सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार हवाई दल, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका हवाई वाहतुकीच्या दृष्टिने धोकादायक इमारतींचा अहवाल न्यायालयाला सादर करणार आहेत. पुणे महापालिकेने सर्वेक्षणाचे शुल्क भरले असून पिंपरी-चिंचवड महापालिकाही लवकरच शुल्क भरणार आहे. त्यानंतर सर्वेक्षण होईल.
पठाणकोट हवाई तळावर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशातील सर्वच विमानतळांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे. हवाई दलाच्यादृष्टीने लोहगाव विमानतळ महत्त्वाचे आहे. ‘सुखोई’ या लढाऊ विमानांचा सराव या विमानतळावरून होतो. शत्रूराष्ट्रांकडून हवाई हल्ला झाल्यास मध्य भारतातून प्रत्यूत्तर देण्यासाठी या विमानतळाचा वापर होऊ शकतो.
यामुळे हवाई दलाची मोठी यंत्रणा येथे कार्यरत आहे. मात्र, विमानतळाच्या १०० मीटर अंतरावर मोठया प्रमाणात इमारती बांधल्या गेल्या आहेत. इमारतींच्या उंचीमुळे हवाई दलाच्या अथवा प्रवासी विमानांच्या वाहतुकीला अडथळा होऊ शकतो. या इमारतींचा वापर करून प्रवासी अथवा लष्करी विमानांना लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या आढावा घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार सर्वेक्षण होईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विमानतळाच्या सीमा भिंतीपासून १०० मीटर अंतरावरील इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार हवाई दल, पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका एकत्र येऊन सर्वेक्षण करतील. त्यासाठी पुणे महापालिकेने शुल्क भरले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल न्यायालयात सादर होईल. त्यानंतर पुढील आदेशानुसार कार्यवाही होईल.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
पुणे विमानतळ हे देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील विमानतळ आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे. सुरक्षेशी तडजोड करून इमारती बांधल्या जात असतील तर ते चुकीचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
इमारतींवर निर्बंध का
विमानतळाच्या जवळ उंच इमारती असल्यास उड्डाण व लँडिंगला फटका बसू शकतो
रहिवासी इमारतीत वापरण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणांमुळे विमानांच्या नॅव्हिगेशनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता
लाइट अथवा काचांमुळे वैमानिकांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची भीती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.