दौंड : विकासाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीबद्दल विरोधक काही वेगळे बोलू शकत नाहीत. विरोधकांकडे आज कुठलाही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. म्हणून महायुतीच्या जास्त जागा आल्या तर राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही टीका केली. भाजपचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, या निवडणुकीनंतर निवडणुका होणार नाही आणि पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटनेत बदल करतील, असे नेहमीचे मुद्दे विरोधकांकडून पुढे केले जात आहेत. गैरसमज निर्माण करून अल्पसंख्य आणि मागासवर्गीय समाजामध्ये थातूरमातूर व खोटानाटा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. परंतु महायुती महाराष्ट्राचा विकास आणि केंद्राच्या अखत्यारित प्रश्न ठराविक काळात मार्गी लावण्यासाठी व्यूहरचना करून ही निवडणूक लढवत आहे.
अजित पवार म्हणाले, मागील काळात आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. पण ही लोकसभा निवडणूक हे काय गावकी - भावकीचे भांडण नाही. देशाचे भवितव्य ठरविणारी आणि तरूण पिढीला दिशा दाखविणारी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे. निवडणुकीच्या दरम्यान आम्ही महत्वाच्या स्थानिक प्रश्नांचा उहापोह करणार आहोत. परंतु मतदारांसाठी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजबूत नेतृत्व हवे आहे का काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांचे नेतृत्व हवे आहे? हे ठरविणारी ही निवडणूक आहे.
आचारसंहिता लागू होणार हे गृहीत धरून दुष्काळासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी त्यासाठी लागणारी आवश्यक तजवीज करून ठेवलेली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने त्यावर फार बोलू शकत नाही. राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत. टँकर दिले जात आहेत. चारा डेपो सुरू करण्याची मागणी आहे व ते लवकर सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळ निवारणासाठी केंद्राचा निधी येईल, असे अजित पवार म्हणाले.
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील नाराजी दूर झाली का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, त्यांची नाराजी दूर झाली आहे. आमची दोघांची नाराजी दूर झालेली आहे, असे मी आणि हर्षवर्धन स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी या वेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.