लोणी काळभोर - जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पहाटे पुण्यातून मार्गस्थ झाला. योगिनी एकादशीचा वारकऱ्यांचा उपवास, दिवसभर उन्हाच्या झळा, घामाच्या धारांमध्ये चिंब भिजलेला सोहळा बुधवारी रात्री आठ वाजता लोणी- काळभोर गावातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात विसावला.
नाना पेठेत मंगळवारी रात्री धोडोपंतदादा दिंडीचे कीर्तन झाले. तर देशमुख दिंडीच्या वतीने जागर झाला. देवस्थानने सकाळी पादुकांची पूजा केली. पुलगेट, भैरोबानाला, फातिमानगर, रामटेकडी, मगरपट्टा चौकमार्गे गाडीतळ येथे साडेबारा वाजता हडपसरला पोचला. हडपसर ग्रामस्थ भजनी मंडळाने नेहमीच्या अभंगासह धन्य आजी दिन। झाले संताचे दर्शन।। हा अभंग घेतला होता. तीच भावना ग्रामस्थांची होती.
खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, व हडपसर ग्रामस्थांनी पालखी रथातून खांद्यावरून विसाव्याच्या चौथऱ्यावर ठेवली. आरतीनंतर सोहळा विसावला. पालिकेचे अतिरिक्त रवींद्र बिनवडे, पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख स्वागताला उपस्थित होते. मांजरी फार्म, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन येथे विसावा घेत रात्री आठ वाजता पोचली. समाज आरतीनंतर सोहळा मुक्कामी विसावला.
आज सोहळ्यात
मालक देहूकरांच्या वतीने सकाळी सहा ते आठ कीर्तन
कीर्तनानंतर यवतकडे मार्गस्थ
देहू पंढरपूर वाटचालीतील २७ किलोमीटरचा मोठा टप्पा
हवेलीतून दौंड तालुक्यात प्रवेश
लोणी काळभोर पालखी तळावर गतवर्षी पाणी साठले होते. याबाबत, प्रांताधिकारी व ग्रामस्थ यांनी पाठपुरावा केला होता. महसूल विभाग, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांनी तळावर व्यवस्था केली. सोहळा दरवर्षी प्रमाणे पालखी तळावरच विसावला.
- पुरुषोत्तम मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज देहू संस्थान
दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा तळावर विसावल्याने ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. आषाढी एकादशीच्या अगोदरची आजच्या एकादशीला सोहळा आमच्या गावातील मंदिरात असतो. आम्हा ग्रामस्थांसाठी गौरव व परंपरेची घटना आहे. अशीच ती सुरु राहावी. अशी आमची मागणी आहे.
- योगेश काळभोर, सरपंच लोणी काळभोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.