छत्रपतींच्या दृष्टीहीन मावळ्याकडून हडसर किल्ल्याची सुरक्षा!

छत्रपतींच्या दृष्टीहीन मावळ्याकडून हडसर किल्ल्याची सुरक्षा!
Updated on

जुन्नर : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'..... हर.... हर  महादेव....'जय भवानी'....'जय शिवाजी' च्या गजरात भंडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करत सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर रविवार (ता. २०) रोजी ऐतिहासिक हडसर उर्फ पर्वतगडावर भव्य सागवानी प्रवेशद्वाराचे मोठ्या उत्साहात दुर्गार्पण केले.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी हा उपक्रम हाती घेऊन पूर्ण केला. रविवार (ता. १३) रोजी हा महादरवाजा सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अथक मेहनतीने गडावर नेला. यासाठी राज्यातील अनेक दुर्गसेवक आवर्जून उपस्थित होते. हा सागवानी लाकडाचा सुबक असा महादरवाजा अकोले जिल्हा नगर येथील भास्कर गोरे यांनी बनविला आहे. भास्कर गोरे दिव्यांग असूनही त्यांनी सुबक असे महाद्वार बनविले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

स्वराज्याच्या महादरवाजाचे दुर्ग पूजन व दुर्गापर्ण सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण हडसर किल्ल्याला सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी फुलांचे तोरण, माळा तसेच विद्युत रोषणाईने सजवलेले होते. यामुळे हडसर गडा सौदर्य अधिक खुलले होते.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे दुर्ग सेवक सोहळ्यासाठी उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमीच्या वतीने हा सुमारे ६०० किलो वजनाचा सागवानी लाकडाचा दरवाजा १३  डिसेंबर रोजी किल्ल्यावर नेऊन बसवला होता. त्याच्या दुर्गपूजन व दुर्गार्पण  सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक अभिजीत पानसे , स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे, अभय राज शिरोळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे राज्याच्या विविध भागातून आलेले दुर्गप्रेमी, हडसर व राजूर गावचे सरपंच व ग्रामस्थ  उपस्थित होते.

यावेळी गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत अभिजित पानसे, अजय तापकिरे, अभय राज शिरोळे या प्रमुख पाहुण्यांनी सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांचे तोंड भरून कौतुक केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य अलौकिक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संरक्षण करून   या वास्तू संवर्धन करण्याचा संस्थेचा मानस हा जनतेपुढे एक खूप आदर्श आहे. सह्याद्री ही संस्था सह्याद्रीच्या नावाप्रमाणे त्यांचे कार्य  करत आहे. या कार्याची तुलना कोणी करू शकत नाही असे गौरवोद्गार या वेळी व्यक्त केले. 

भंडाऱ्याची उधळण केल्याने संपूर्ण हडसर गड हा पिवळ्या सोन्याच्या मध्ये न्हाऊन निघाला होता. फक्त खंडेरायाची जेजुरी सोन्याने पिवळी व्हायची पण आता सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांमुळे महाराजांचे गड-किल्ले ही सोन्याने न्हाउन निघू लागले आहेत. 

"यापूर्वी सह्याद्रीच्या दुर्गसेवकानी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील  अनेक किल्ल्यांवर जवळपास सोळा भव्य लाकडी सागवानी दरवाजे व जवळपास ३५ दिमाखदार तोफगाडी बसवले आहेत. आणि सर्व किल्ल्यांना व वास्तूंना त्यांचे वैभव परत मिळवून देण्याचा मान त्यांना दिला आहे. हे कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत असेच अविरत चालू राहील.
चौकट मजकूर : या सोहळ्यासाठी जळगांव येथील दिव्यांग निलेश बागुल यांचेसह विविध भागातून आठ ते दहा दिव्यांग हडसर गडावर उपस्थित होते. दोन्ही पाय नसताना देखील तीन चाकी सायकलच्या सहाय्याने हडसर सर करताना अन्य दुर्गप्रेमींनी अवघड ठिकाणी दिव्यांगाना वर-खाली जाण्यासाठी मदत केली.

गेल्या काही वर्षात हडसरच्या प्रवेशद्वाराशी लहान मोठ्या दगडांचा खच पडला होता.  अनेकांजण या दगडातून वाट काढत पुढे जात. येथील हे मोठे दगड बाजूला करून त्या महादरवाजास मोकळा श्वास देण्यासाठी सह्याद्रीचे दुर्गसेवक पुढे आले. 
त्यांनी हलवून बाजूला न करता येणारे मोठं मोठे दगड पूर्ण फोडून तो दरवाजातील मार्ग मोकळा केला. आणि त्याला सागवानी प्रवेशद्वार बनवण्याचा निश्चय केला होता.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.