Malshej Ghat
Malshej Ghatsakal

Malshej Ghat : माळशेज घाट मनमोहक धबधब्यांनी बहरला; गर्द झाडी, दाट धुक्यामुळे पर्यटकांना आकर्षण

नगर-कल्याण महामार्गावरील पुणे, ठाणे, अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा रेषेवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला माळशेज घाट हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे.
Published on

ओतूर - नगर-कल्याण महामार्गावरील पुणे, ठाणे, अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा रेषेवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला माळशेज घाट हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. दाट धुके, गर्द झाडी, झाडीतून पक्षांची ऐकू येणारी किलबिल, फेसाळत हजारो फुटांवरून कोसळणारे धबधबे, अशा निसर्ग सौंदर्याने माळशेज घाट नटलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्षाविहारासाठी हा घाट पर्यटकांना आकर्षित करत आहे.

सध्या माळशेज घाटातील धबधबे पूर्ण क्षमतेने अजून वाहत नसले तरी, आल्हाददायक वातावरण व सर्वत्र पसरलेली हिरवळ, छोट्या प्रमाणात वाहत असलेले धबधबे या सर्वांनी माळशेज घाट बहरला आहे.

वर्षाविहार करणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरत आहे. तसेच जसजसे पावसाचे प्रमाण वाढत जाईल, तसतसे माळशेज घाटात लहान-मोठे तीस ते पस्तीसपेक्षा जास्त धबधबे वाहू लागतात. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळ यांनी माळशेज घाटात पर्यटकांसाठी ठिकठिकाणी सिमेंट बॉक, लोखंडी पाइपचे कठडे, वेगवेगळ्या ठिकाणी धबधब्यापर्यंत जाण्यास सिमेंट रस्ते, पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते जे मागील पावसाळ्यात उखडले होते, ते सर्व दुरुस्त केले आहेत. तसेच बसण्यासाठी विशेष व्यवस्था, छत्र्या व धोक्यासाठी सूचना फलक लावले आहे.

घाट वर्षाविहारासाठी सज्ज

तसेच याठिकाणी स्थानिक तरुणांनी थाटलेली मक्याच्या कणसांची व इतर रानमेवा विक्रीची दुकाने ही पर्यटकांना भुरळ घालत आहे. चहा, कॉफी, गरम भजी, वडापाव यावर पर्यटक ताव मारताना दिसत आहे. एकूणच माळशेज घाट वर्षाविहारासाठी सज्ज झाला आहे.

मढ गावाच्या पुढे नाकाबंदी

माळशेज घाटात ओतूर पोलिस प्रशासनाने मढ गावाच्या पुढे नाकाबंदी केली आहे. त्यात ओतूर पोलिस मद्यपी व मद्य सेवन करणाऱ्या, मद्य घेऊन जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करत आहेत. यामुळे वाहनचालकांना थोडा त्रास जरी होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने हे पोलिसांचे महत्त्वाचे पाऊल असलेल्याचे मत कुटुंबासह वर्षाविहाराला आलेले पर्यटक व्यक्त करतात.

जबाबदार पर्यटक म्हणून वागावे

  • माळशेज घाटात कित्येक ठिकाणे धोकादायक आहेत.

  • सेल्फीसाठी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.

  • प्लॅस्टिक कचरा इतरत्र टाकू नये.

  • घाटातून धुक्यात वाहन चालवताना गाडीच्या लाइट चालू ठेवाव्या,

  • वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने उभी करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.