पुणे : अनाथालय, वृद्धाश्रमासाठी अनेकजण पुढाकार घेतात. पण पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे फक्त एचआयव्ही बाधित ३५ मुलांची आई बनलेल्या शिल्पा बुडूख-भोसले यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. ममता फाउंडेशनच्या माध्यमातून त्या तळमळीने मुलांमध्ये जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करत त्यांचे संगोपन करत आहेत. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत या हिरकणीने ममतेचे मंदिर उभारून कोमेजणाऱ्या फुलांना नवसंजीवनी दिली आहे.
चंदेरी दुनियेची आवड असणाऱ्या शिल्पा यांनी 'जाणता राजा', 'वऱ्हाड निघालं लंडनला' तसेच विविध एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनय केला. पण अनाथांसाठी काम करण्याच्या जाणीवेतून त्यांनी समाजाने नाकारलेल्या, ज्यांची कोणतीही चूक नसणाऱ्या एचआयव्ही बाधितांसाठी काम करण्याचा वसा घेतला. लोणावळा येथील संपर्क बालग्राममधून कामाचा अनुभव आत्मसात केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी फाउंडेशनची स्थापना केली. बालाजीनगर, पुणे येथे भाड्याच्या जागेत एक रोपटे लावून श्री गणेशा केला. बालकल्याण समितीकडून घेतलेल्या दोन मुलांचा सांभाळ करत सुरू केलेला हा यज्ञ अनेक अडचणींचा सामना करत अव्याहतपणे सुरू आहे. दरम्यान, मंदिराच्या हक्काच्या जागेचा प्रश्न नगरसेवक प्रकाश कदम यांनी सोडविला.
संस्थेमध्ये आता अडीच ते १८ वर्षांपर्यंतची मुले-मुली आनंदाने राहात आहेत. निसर्गाच्या सानिध्यात, हसतीखेळती व निरोगी मुले पाहून ही एचआयव्ही बाधित आहेत, असे कोणी म्हणत नाही. संस्थेतमध्ये सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. सहली, मेडिटेशन, योग शिबिरांचे आयोजन केले जाते. मुलांनी विमान प्रवासही केला आहे. गुजर-निंबाळकरवाडी तसेच परिसरातील लग्न, विविध समारंभ, वाढदिवसासाठी संस्थेतील मुलांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते, असे शिल्पा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. आतापर्यंत संस्थेला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, भारत गणेशपुरे तसेच विविध राजकीय मंडळी, पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
ताठमानाने जगता येते
ममता फाउंडेशनमधील अश्र्विनी व रजिया या दोन मुली फॅशन डिझायनिंग शिकत आहेत. काही मुलांनी अकाउंडमध्ये चमक दाखविली आहे. दोघेजण नोकरीही करतात. योग्य शिक्षण, मार्गदर्शन केल्यामुळेच आम्हाला समाजात ताठ मानेने, संकोच न बाळगता जीवन जगता येत आहे, असे येथील अक्षय याने सांगितले.
ममता फाउंडेशनमधील माझ्या ३५ मुलांच्या संगोपणाचे शिवधनुष्य दानशुरांमुळेच पेलू शकत आहे. शासकीय मदतीशिवाय सध्याच्या महागाईचा सामना करत मुलांचे आरोग्य, पौष्टिक आहार व शैक्षणिक जबाबदारीचे आव्हान पेलत आहे. यासाठी दरमहा सुमारे साठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. एचआयव्ही बाधित मुलांबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी सर्वच घटकांनी काम करायला हवे.
- शिल्पा भुडूख-भोसले, ममता फाउंडेशन, पुणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.