Gold Theft : सराफ दुकानातील पाच किलो सोने चोरून व्यवस्थापक पसार

प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच पाच किलो सोन्याचे दागिने आणि ५० किलो चांदी असा सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला.
crime
crimesakal
Updated on

पुणे - सराफ दुकानात प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकानेच पाच किलो सोन्याचे दागिने आणि ५० किलो चांदी असा सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. हडपसर परिसरातील माळवाडी रस्त्यावरील वसुंधरा ज्वेलर्स या सराफ दुकानामध्ये हा प्रकार घडला.

याबाबत ज्योतिरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय २२, रा. बाणेर रस्ता, औंध) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी (वय ३५, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य यांनी दोन वर्षांपूर्वी सराफ व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे आरोपी विनोद कुलकर्णी दुकानात व्यवस्थापक म्हणून कामास होता. यश यांनी दागिने घडविण्यासाठी पाच किलो सोने आणि ८५ किलो चांदी खरेदी केली होती. त्यांनी सोने, चांदी व्यवस्थापक कुलकर्णी याच्याकडे दिली होती. त्यानंतर यश उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यश मागील डिसेंबरमध्ये पुण्यात परतले. त्यावेळी त्यांना दुकानात पावणेतीन किलो सोने आणि ५० किलो चांदी कमी असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत कुलकर्णीकडे विचारणा केली. त्यावर कुलकर्णीने सात फेब्रुवारीला सर्व सोने, चांदी परत करून हिशेब देतो, असे सांगितले. त्यानंतर आठ फेब्रुवारीला कुलकर्णीने सकाळी सराफ दुकानातील कर्मचाऱ्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने मालकाला हिशेब द्यायचा आहे.

तसेच, सराफ दुकानात प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कुलकर्णीने सराफ दुकानातील कर्मचाऱ्यांकडून उर्वरित सोने आणि चांदी घेतले आणि तो पसार झाला. कुलकर्णीने पाच किलो, ५० किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड अशी एकूण सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.