मंचर : मंचर (ता.आंबेगाव) शहर व परिसरातील १५ गावात ऐन गणेशोत्सवाच्या सणात सतत दिवसा व रात्री वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर चार ते पाच तासानंतर पूर्ववत सुरू होतो;त्यामुळे गणेश भक्त, गृहिणी व व्यावसायिक हैराण झाले आहेत. अनेक मंडळांना मेणबत्या लाऊन आरत्या कराव्या लागल्या.
महावितरण कंपनीने त्वरित सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव व रास्ता रोको करण्याचा इशारा महावितरण कंपनीच्या मंचर येथील अधिकाऱ्यांना मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (ता.२२) दिला आहे.
“बुधवारी (ता.२०), गुरुवारी (ता.२१) व शुक्रवारी (ता.२२) सतत विजेचा लपंडाव सुरु होता. मंचर शहरात, मुख्य बाजार पेठेत, बाजार समितीच्या पूर्वेला व अन्य वाड्यावस्त्यावरही गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता.
त्यानंतर सतत विजेचा लपंडाव सुरु होता. पिठाच्या गिरण्या बंद होत्या. घरगुती व काही मंडळांना गौरी गणपतीच्या आरत्या मेणबत्या लाऊन घ्याव्या लागल्या.” असे मंचर शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी सांगितले.
महावितरण कंपनीच्या मंचर कार्यालयात अभियंता एस.बी राणे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तातडीने सुरळीत वीज पुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव व रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
शिष्ठमंडळात मंचर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले, थोरात, प्रवीण मोरडे, विकास बाणखेले, खलीद इनामदार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
“वीज पुरवठ्या अभावी अवसरी खुर्द येथील नळपाणी पुरवठा योजना बंद पडली; त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पाऊस सुरु असताना कसरत करावी लागली.अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे.”असे अवसरी खुर्द महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रामदास भोर यांनी सांगितले.
आदर्शगाव गावडेवाडी,भोरवाडी, लांडेवाडी. शेवाळवाडी, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग,एकलहरे, पिंपळगाव येथेही विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “काठापूर (ता.आंबेगाव) येथे अती पाऊस व विजा कोसळल्याने तेथील अति उच्चदाब उपकेंद्रातील केबल जळाली. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीज वाहिन्याही तुटल्या व खांबावरील विद्युतरोधक फुटले.
अश्या लागोपाठ आल्याल्या अनेक प्रसंगामुळे अखंडित वीज पुरवठा देता आला नाही. शुक्रवारी (ता.२२) दुपारनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात महावितरणला यश आले आहे. नैसर्गिक संकटामुळे खंडित वीज पुरवठा झाल्याबद्दल दिलगीर आहोत.”
- अनिलकुमार डोंगरे, उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मंचर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.