विभागीय आयुक्त राव यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ (१) अनुसार उंद्रे यांना ग्रामपंचायत सदस्यत्व आणि सरपंच या दोन्ही पदांना अपात्र ठरविले आहे.
पुणे - मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल उंद्रे यांना सरपंच पदावरून दूर करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला आहे. नियमबाह्य व बेकायदा ठराव केल्याचा ठपका उंद्रे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने हवेली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांना दिला आहे.
विभागीय आयुक्त राव यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९ (१) अनुसार उंद्रे यांना ग्रामपंचायत सदस्यत्व आणि सरपंच या दोन्ही पदांना अपात्र ठरविले आहे. या नियमबाह्य व बेकायदा ठरावप्रकरणी मांजरी खुर्द येथील ग्रामस्थ संदीप उंद्रे यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ३१ मे २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. विद्यमान सरपंच निखिल उंद्रे हे या ठरावाच्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होते. हा ठराव २२ मार्च २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु हा ठराव नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त राव यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश आयुष प्रसाद यांना दिला होता. यानुसार प्रसाद याबाबत चौकशी करण्याचा आदेश हवेलीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिला होता. या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती.या चौकशीत ग्रामपंचायतच्या कामकाजात अनियमितता झाल्याचा अहवाल जोशी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला होता.
ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाला आम्ही केवळ सूचक आणि अनुमोदक आहेत. हा ठराव करणारे वेगळेच आहेत. हा ठराव करण्याशी आमचा काहीही संबंध नाही. शिवाय हा ठराव केल्यानंतर झालेल्या पहिल्याच मासिक सभेत त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र याप्रकरणी केवळ सूचक आणि अनुमोदक यांनाच कसे काय दोषी ठरवले. तसं पाहिलं तर या ठराव मंजूर करण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई व्ह्यायला हवी होती. आमच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई ही चुकीची आहे.
- निखिल उंद्रे, निलंबित सरपंच, मांजरी खुर्द, ता. हवेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.