पुणे : बालाजीनगर येथील रजनी कॉर्नरच्या पाठीमागील काकडे, पगारे तसेच कळसकर चाळीतील लहान मुलांसह ज्येष्ठांना जलतांडवामुळे बुधवारी घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागली. संसारोपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तू वाहून जाताना हताशपणे पाहण्याची वेळ हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांवर आली.
आंबिल ओढ्याशेजारील घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्याने पगारे गल्लीतील संजना चऱ्हाटे व शुभांगी चऱ्हाटे यांच्यावर आभाळच कोसळले. घरातील दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, पोटाला चिमटा घेऊन साठविलेले पैसे पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. काही जणांचे कपड्यांसह पाण्यात घरातील साहित्य, सिलिंडर, शेगड्याही वाहून गेल्याने अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीच शिल्लक राहिले नाही.
घरात शिरलेला राडारोडा काढण्यासाठी मनपा, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणतीच मदत केली नसल्याची खंत या वेळी सोनाली पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
जपला माणुसकीचा ओलावा
आंबिल ओढ्याच्या शेजारील सुमारे 10 चाळींमधील घरात साचलेले पाणी व राडारोडा काढणाऱ्या नागरिकांसाठी बालाजीनगर येथील विष्णू पाटील यांनी नाश्त्याची सोय केली. पाटील यांनी जपलेल्या माणुसकीच्या ओलाव्यामुळे हताश झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. प्रथमेश काळगे, आकाश सोळसकर, सत्यम लांडे, आकाश बोंबले यांनी यावेळी सहकार्य केले.
रात्री साडेनऊ वाजता स्वयंपाक करतानाच काही कळायच्या आतच घरात पाणी घुसले. जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडलो म्हणून जीव वाचला. रात्री भावाकडे आसरा घेतला. सकाळी येऊन पाहिले तर घरात होते नव्हते तेवढे वाहून गेले होते. साठवलेले पैसे व महिन्याचा पगार पाण्यात वाहून गेल्याने पोटाची खळगी भरायची कशी?
- सीमा मोरे, घरकाम करणारी महिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.