Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पुण्यातही पडसाद, टायरची जाळपोळ करत रोखला महामार्ग

पुणे-बंगळूर महामार्गावर तीन तासात १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, शहरात ठिकठिकाणी एकत्र येत मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन.
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

पुणे - मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असताना मंगळवारी या आंदोलनाचे पडसाद पुणे शहरातही उमटले. शहराच्या वेगवेगळ्या भागात मंगळवारी आरक्षणाची मागणी व मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, विविध समाज घटकांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

तर, पुणे-बंगळूर महामार्गावरील वडगाव पूल येथे आंदोलकांनी महामार्गावर टायरची जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती, त्याचा सर्वाधिक फटका रूग्ण, प्रवासी, नोकरदारांसह शालेय विद्यार्थ्यांना फटका बसला.

रास्ता पेठ येथे मंगळवारी दुपारी आंदोलन घेण्यात आले. प्रा.वाल्मीक जगताप व मराठा समाज यांच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश बागवे, संजय मोरे, दत्ता पोळ, बाळा शेडगे, हनुमंत साठे, सुनील शिर्के, गोपाळ पायगुडे, दिलीप बहिरट, मीना पवार, रेखा जगताप आदी उपस्थित होते. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, नाना पेठ व मंगळवार पेठेतील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलकांनी टायर जाळले, तीन तास महामार्ग ठप्प

धायरी - मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता वडगाव पूल येथे महामार्ग अडविण्यास सुरवात केली. महामार्गावरील वडगाव बुद्रूक व कात्रज दरम्यानच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका आंदोलकांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली.

आंदोलकांनी टायरची जाळपोळ करून ते महामार्गावर टाकले. त्यानंतर वाहनांवर चढून 'जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर दुपारी तीन वाजता महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास सुरवात झाली.

विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू

औंध - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडी, बावधन, बहिरटवाडी, खैरेवाडी, गोखलेनगर, जनवाडी, मॉडेल कॉलनी, भोसले नगर, वाकडेवाडी, मुळारस्ता, पाटील इस्टेट, संगमवाडी, पांडवनगर, छत्रपती शिवाजी महाराजनगर, पीएमसी कॉलनी या परिसरातील मराठा नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

मुस्लिम संघटना, सोसायट्यांकडूनही आंदोलनास पाठिंबा

कोंढवा - कोंढवा येवलेवाडी येथे मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येवलेवाडी ग्रामस्थ व सकल मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल मराठा समाज टिळेकर नगर यांनीही उपोषणाला पाठिंबा दर्शविला. कोंढव्यातील दशरथ मरळ चौकातही साखळी उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.

दरम्यान, कोंढवा येथे दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजानेही एक दिवस लाक्षणिक उपोषण करून जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन मुस्लिम धर्मीय नागरिकांनी केला. कोंढव्यातील टिळेकर नगर येथील "थ्री ज्वेल्स' सोसायटीतील नागरिकांनी देखील आंदोलनास पाठिंबा दिला.

विविध ठिकाणी आंदोलकांनी केलेल्या मागण्या

- सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा आरक्षण जाहीर करावे

- जरांगे पाटील यांचे उपोषण तत्काळ सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत

- आरक्षणाचा निर्णय नाही, तोपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी, दिवाळी साजरी होणार नाही

- आंदोलकांनी वडगाव पुलाजवळ महामार्ग रोखला

- तीन तास वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा १० किलोमीटरपर्यंत.

- स्कूल व्हॅन आंदोलनात अडकल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

- १० ते १२ रुग्णवाहिका आंदोलनावेळी अडकल्या

- आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बैलगाड्या उतरल्या रस्त्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.