मराठी शाळांतील शिक्षकांच्या सतरा हजार जागा रिक्त!

अकरा वर्षांपासून शिक्षकांची भरती बंदच बंदी उठली तरी भरती होईना
techer
techersakal
Updated on

पुणे : तब्बल अकरा वर्षांपासून मराठी आणि उर्दू शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. यामुळे सद्यःस्थितीत या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या १८ हजार ४९ जागा अद्याप रिक्तच आहेत. एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील १६ हजार ७४८ जागांचा समावेश आहे. सन २०१९ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठली आहे. परंतु बंदी उठून चार वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होत नसल्याचे दिसून आले आहे.

प्राथमिक शिक्षकांची राज्यात सर्वाधिक १ हजार १९६ जागा या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात रिक्त असून, सर्वात कमी म्हणजेच केवळ ८७ जागा या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. या वृत्ताला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे.

राज्यात सन २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या जागा भरल्याच जाणार नसतील तर, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अघ्यक्ष महेश ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. याच नियमाच्या आधारानुसार सध्या १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत. सन २०११ मध्ये काही खासगी शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षक भरतीवरच बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, राज्य सरकारने २०१९ मध्ये तत्कालीन महायुती सरकारने ‘पवित्र पोर्टल`च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्यावेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु खासगी अनुदानित संस्थांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नसल्याचेही उघडकीस आले आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामध्ये नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा आदी शाळांमधील रिक्त जागांचा समावेश नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मराठी शाळांतील शिक्षकांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा

नगर - ३४७

अकोला - २२८

अमरावती - ३२०

औरंगाबाद - ५६९

बीड - ४११

भंडारा - ३०८

बुलडाणा- १७३

चंद्रपूर- २०४

धुळे - ३२१

गडचिरोली - २६५

गोंदिया - २९१

हिंगोली - ८७

जळगाव - ३६३

जालना - २०३

कोल्हापूर - ९७२

नागपूर - ७६९

नांदेड - ७३२

नंदूरबार - ३४५

नाशिक - ५३१

पालघर - १९१६

यवतमाळ - १३०७

परभणी - ३४६

पुणे - १६४

रायगड - १०५१

रत्नागिरी - ८४८

सांगली - ६६६

सातारा - १०२३

सिंधुदुर्ग - ५७६

सोलापूर - ४८४

ठाणे - ५४१

वर्धा - २०४

वाशीम - १२३

एकूण - १६, ७४८

उर्दू शाळांतील रिक्त जागा

नगर - ०२

अकोला - १२१

अमरावती - ०४

औरंगाबाद - ९६

बीड - ७५

बुलडाणा - ७६

धुळे - २७

जळगाव- १९७

जालना - ३१

कोल्हापूर - १८

नागपूर - ०१

नांदेड - ५६

नंदूरबार - ३२

नाशिक - ०३

पालघर - ५७

यवतमाळ - ६८

परभणी - ४५

पुणे - ०६

रायगड - ११४

रत्नागिरी - ८४

सांगली - ३५

सातारा - ०५

सिंधुदुर्ग - २६

ठाणे - ३६

वर्धा - ११

वाशीम - ५०

एकूण - १३०१

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी शिक्षक भरतीवर बंदी होती. त्यामुळे या जागा भरता आलेल्या नाहीत. परंतु आता शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकार या भरतीबाबतचा अभ्यास करत आहे. येत्या काळात लवकरच शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

- दीपक केसरकर,शालेय शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.