चिखली - पूर्वी लग्नात नवरदेव मनगटी घड्याळ, सायकल, रेडिओ, अंगठी आदी वस्तूंसाठी आडून बसत. मात्र, लोकांकडे जसा पैसा वाढला तशा मागण्याही वाढल्या. आता मोटारीच्या शौकिनांची संख्या वाढली आहे. गुंठा मंत्री आणि धनदांडग्या प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘हुंडा नको, गाडी हवी’ असा नवा ट्रेंड निर्माण झाल्याने वधूपित्याचाही नाइलाज होत आहे.
गुंठ्याला भाव आल्याने लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. हुंडाबंदी कायद्याचे आपण पालन करतो, असे सांगणारे मुलाची इच्छा आहे असे सांगून किमती मोटारीची मागणी करताना दिसतात. मोटार घेताना वधूपित्याचा मान राखायला हवा, मिळालेली भेट नाकारायची कशी, अशी पुस्ती ते जोडतात. उपनगरात अशा गुंठा मंत्र्यांची सध्या चांगलीच चलती आहे. जावयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किमती दुचाकी आणि चारचाकी मोटारी भेट देण्याची पद्धत सुरू झाली. वधूपित्यालाही ऐपत नसली तरी जावयाच्या हट्टापुढे हात टेकावे लागत आहे. त्याचे हे काही किस्से.
मोशीतील एका कुटुंबातील दोन मुलांपैकी मोठ्याला त्याच्या सासरकडून दहा लाखांची मोटार भेट मिळाली. दुसऱ्या मुलगाही आपल्या लग्नात मोटारीसाठी आडून बसला. मग त्या मुलाच्या वडिलांनीच ३५ लाखाची मोटार खरेदी केली. मुलाच्या होणाऱ्या सासऱ्याला बोलावून ही मोटार तुमच्या होणाऱ्या जावयाला लग्नात भेट द्या आणि हप्ते तुम्ही भरा, असे सांगितले. मुलीच्या प्रेमापोटी वधूपित्यानेही आपली दोन गुंठे जागा विकून जावयाची इच्छा पूर्ण
केली.
चिखलीत एकाने मुलीच्या लग्नात जावयाला मोटार भेट दिली आणि मुलाच्या लग्नात मोटारीची मागणी केली. वधूपित्याने जावयाला मोटार भेट दिली. मात्र, त्या वधूपित्याचे इतर जावई आडून बसले. त्यातून मार्ग काढण्यासाठी वधूपित्याने दोन जावयांना बुलेट भेट दिली.
एकाने म्हेत्रेवस्ती येथील एका मुलीशी प्रेमविवाह केला. तिच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय असल्याने दहा चौरस फुटाच्या खोलीत राहणारा हा जावई सासऱ्याकडे मोटार आणि दहा सदनिकांची मागणी करत आहे. मुलीचे वडील काही पुढाऱ्यांमार्फत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
अवैध मार्गाने मिळविला जातो हुंडा
कुदळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी बालघरे म्हणाले, ‘‘कायद्याने हुंडा बंदी असली तरी लालची नवरदेवाला कशाही स्वरूपात हुंडा हवा असतो. आपण किती पुढारलेले आहोत, हे सांगत आम्ही मुलीला बुलेट, मोटार दिली, तुम्ही पण द्या, अशी खुली मागणी केली जाते. त्यामुळे हुंडा न घेता अवैध मार्गाने संपत्ती मिळवली जात आहे.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.