कात्रज, ता. ३ : उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर खासगी बसकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागणार असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. खासगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या दरात तब्बल २० ते २५ टक्के एवढी भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेल दरवाढ झाल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे.
पुणे शहर आणि परिसरात विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला कोकणातील रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,
सोलापूर, सांगली, सातारा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड या भागांतून मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. या सर्वच मार्गांवरील खासगी बसचालकांनी तिकीटदरात वाढ केल्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. पुण्यातून साधारणतः राज्यातील विविध भागांत दररोज दोन ते अडीच हजार बस चालतात. या माध्यमातून दररोज १ लाख प्रवाशांची ये-जा होत असते.
खासगी बसला एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारण्यात आल्यावर परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दीडपटपेक्षा जास्त दर आकारला जाणार नाही, याची खबरदारी खासगी बसचालकांकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक
पुण्यातील वाकड, निगडी, पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, भोसरी, नाशिक फाटा, वारजे, वडगाव, कात्रज, पद्मावती, स्वारगेट, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, वाकडेवाडी, हडपसर, येरवडा, वाघोली या भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते.
महिलांच्या सवलतीमुळे दरवाढ कमी
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. याचा खासगी बससेवांना काहीसा फटका बसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साधारणतः उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत खासगी बससेवा देणाऱ्यांकडून दुप्पट वाढ केल्याचे पाहायला मिळते.
परंतु यावर्षी ती वाढ काहीशी कमी झाली असून दीडपटीपर्यंत थांबल्याचे निदर्शनास येते. पुण्यावरून मुंबई, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नाशिक अशा कमी पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.