60 जणांनी पेलले शिवधनुष्य; तेलुगू नाटकाला प्रेक्षकांची दाद
पुणे - पुण्यात नाटकाचा नावीन्यपूर्ण प्रयोग असला, की प्रेक्षक त्याला हमखास दाद देतात. अशीच दाद "मायाबाजार' या तेलुगू नाटकाला मिळत होती. कारण, एकाच कुटुंबातील 60 सदस्यांनी रंगमंचावर एकत्र येऊन महाभारतासारखे शिवधनुष्य उचलले होते. कधी अभिनयातून, तर कधी गायनातून, कधी नावीन्यपूर्ण "सेट'मधून, तर कधी अभ्यासपूर्ण प्रकाशयोजनेतून ते प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते.
आंध्र असोसिएशनला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर नाट्य मंडळीतर्फे शनिवारी हे नाटक सादर झाले. सुरभी या परिवारातील 60 सदस्य यात सहभागी झाले होते. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे नाटकाची भाषा मराठी प्रेक्षकांसाठी अडसर ठरत नव्हती. म्हणून तर तेलुगू प्रेक्षकांबरोबरच मराठी प्रेक्षकही नाटकाला दाद देत होते. अभिमन्यू लग्न सोहळ्यावर हे नाटक आधारित होते.
नाटकात कर्णाची भूमिका साकारलेले कोदंडराव म्हणाले, 'माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी या नाटकासाठी योगदान दिले आहे. मी तर लहानपणापासूनच यात भूमिका साकारत आलो आहे. आंध्र प्रदेशातच नव्हे, तर दिल्ली, ओरिसा, नेपाळ, भोपाळ, अमेरिका अशा अनेक भागांत आजवर याचे प्रयोग झाले आहेत.'' या वेळी तेलंगण विधानसभा अध्यक्ष मधुसूदन आचारी, राज्यमंत्री राम शिंदे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, ज्येष्ठ कलावंत रेकंदर नागेश्वरराव, के. व्ही. रमणाचारी, पी. हरिकृष्णा, अभिनेते तनीकेला भारानी उपस्थित होते.
गणेश कला क्रीडा मंच - अभिमन्यू लग्न सोहळ्यावर आधारित "मायाबाजार' नाटक आंध्र प्रदेशातील एकाच कुटुंबातील 60 सदस्यांनी शनिवारी सादर केले. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रयोग ठरला.
|