बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथील गावठाण हद्दीतील प्रलंबित असलेल्या बेल्हे - जेजुरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याच्या कारणावरून श्रेयवादामुळे, आज (ता. ५) जुन्नरचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे दोघेही समर्थकांसह समोरासमोर आल्याने, काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
यावेळी आमदार अतुल बेनके यांनी विरोध डावलत गुलाल आणि भंडारा उधळून नारळ फोडून रस्त्याचे भूमिपूजन केल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बेल्हे येथे गावठाण हद्दीतील प्रलंबित असलेल्या बेल्हे - जेजुरी रस्त्याच्या कामाचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेल्हे - जेजुरी रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ बेल्हे गावठाण हद्दीतील या रस्त्याचे काम अजूनही प्रलंबित आहे.
दरम्यान माजी आमदार शरद सोनवणे यांनी या रस्त्याचे काम हॅम अंतर्गत त्यांच्या कार्यकाळात मंजूर झाले असून, यापूर्वी भूमिपूजन केलेले असल्याने दुसऱ्यांदा भूमिपूजन अवैध असून निषेध व्यक्त करत आम्ही ते होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती.
दरम्यान आज (ता.५) सायंकाळी या रस्त्याचे कामाचे भूमिपूजनाचे वेळी बेल्हे ग्रामपंचायत समोर दोन्हीही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत व्यवस्थित परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांच्या गर्दीमुळे या रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी आमदार अतुल बेनके म्हणाले की, या रस्त्याच्या कामाला नव्याने मंजुरी मिळाली आहे.
कोणाच्याही पायरीला हात न लावता हा रस्ता होणार आहे. बुद्धीने नाठाळ असणाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. कुणीही कितीही आडवे आले तरी सर्व ग्रामस्थांसह तुम्हा सर्वांच्या बळावर भूमिपूजन केले आहे असे आमदार बेनके यांनी यावेळी जाहीर केले.
याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे समवेत पांडुरंग पवार, बाळासाहेब खिलारी अनघा घोडके, अतुल भांबेरे, माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, सावकार पिंगट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समवेत माजी उपसरपंच निलेश कणसे, प्रदीप पिंगट, भाजपचे मोहन मटाले आदींसह तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
तर यावेळी भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनीही माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समवेत सहभागी होत 'डोळ्याने दिसतो तेव्हढा संपूर्ण रस्ता झाला पाहिजे' अशी भूमिका मांडली.
बेल्ह्यात बँक ऑफ इंडियापर्यंत सात मीटर तेथून पुढे साडेपाच मीटरचा रस्ता होणार 'बेल्हे ग्रामपंचायत समोरील बँक ऑफ इंडिया शाखेपर्यंत सात मीटर रस्ता होईल व तेथून पुढे साडेपाच मीटर सिमेंट काँक्रिटचा रस्ता होणार आहे. एकाही घराला धक्का लागणार नाही. रस्ता पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून, जो कुणी आडवा येईल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल.
- अतुल बेनके, आमदार जुन्नर तालुका
संपूर्ण रस्ता सात मीटर रुंदीचा झाला पाहिजे -
बेल्हे गावठाणातील बेल्हे - जेजुरी रस्त्याचे काम झालेच पाहिजे, पण हा भूमिपूजन कार्यक्रम अवैध असून त्याला विरोध आहे. कुणाच्याही पायरीला धक्का न लावता समुर्न गावात सात मीटर रुंदीचा रस्ता व्हायला हवा. या रस्त्याची मंजुरी हॅम प्रकल्पांतर्गत माझ्या कार्यकाळात झालेली आहे.
- शरद सोनवणे, माजी आमदार, जुन्नर तालुका
डोळ्याने दिसतो तेवढा रस्ता झाला पाहिजे
आपल्याला डोळ्याने दिसतो तेवढा मोकळा रस्ता आपल्याला कव्हर करायचा आहे. मात्र अगोदर जलजीवन मिशनची पाईपलाईन अगोदर करण्याची मानसिकता ग्रामपंचायतीची असली पाहिजे. रस्त्याला परत पुढे फोडाफोडी नको, तरच रस्ता चांगला टिकेल. तसेच नळ पाणीपुरवठा योजना अगोदर करणे आवश्यक आहे.
- आशाताई बुचके , भाजप नेत्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.