पुणे : पुण्याच्या खराडी आणि केशवनगर भागात करोडोंच्या संख्येने डासांची आणि कीटकांची वावटळ उठली आहे. याचे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात वावटळ उठूनही महापालिका पातळीवर औषध फवारणी आणि जलपर्णी काढण्याचे उपाय मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. जलपर्णी काढण्यासाठी बायो एन्झायमिंग वापरण्याचे प्रयोग केले जात आहेत.
मात्र जलपर्णी का वाढते आहे यावर उपाय काय आहेत, या विषयी तज्ज्ञ म्हणतात जलपर्णी काढून टाकणे हा तात्पुरता उपाय आहे.
याबाबत बोलताना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, औषध फवारणी आणि जलपर्णी काढण्याचे उपाय दीर्घकालीन नाहीत. औषध फवारणे म्हणजे दुसरे प्रदूषण वाढणार; फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता.
ज्या पाण्यात नायट्रेट फॉस्फेट हे द्रव्य असते अश्या पाण्यात जलपर्णी वाढते. ज्या पाण्यात सांडपाणी मिसळले जाते तिथे असे प्रकार होतात.
त्यामुळे जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय आहे. जोपर्यंत नदीतील पाणी प्रदूषित राहील तोपर्यंत जलपर्णी उगवणे थांबविता येणे शक्य नाही. या विषयावर सखोल अभ्यास करणाऱ्या काही संस्था आहेत त्यांची मदत घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे.
याबाबत पर्यावरण विषयाचे अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, या सगळ्याच्या मागे नदीची प्रदूषणाची पातळी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. यामध्ये मलमूत्र म्हणजेच सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे परदेशी जलपर्णी फोफावली आहे.
या जलपर्णीमुळे डासांना अंडी घालण्यासाठी आदर्शवत अधिवास तयार होतो. जलपर्णीमुळे नदीचे सुपोषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
यामुळे नदीमधील स्थानिक जलचर आणि वनस्पती या पूर्णपणे हद्दपार झाल्या आहेत. सध्या डासांच्या वावटळीवर पाकोळी (स्वैलो) नावाचे पक्षी आणि भारतीय पिपिस्ट्रेल जातीचं वाघळे हवेत उडणाऱ्या डासांना मिटकवताना दिसत आहेत त्यामुळे डासांवर काही अंशी नैसर्गिक नियंत्रण होत आहे.
परंतु डासांची अमर्याद संख्या बघता परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात डासांमार्फत प्रसारित होणारे मानवी आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नदी प्रदूषण मुक्त करणे आणि जलपर्णीची समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.