माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावरील टीकेचे आंबेगावमध्ये तीव्र पडसाद

माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावरील टीकेचे आंबेगावमध्ये तीव्र पडसाद
Updated on

मंचर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरून हीन पातळीवर केलेल्या टीकेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले.

दरम्यान, सागर कोल्हे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत शिवसैनिकांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा निषेध केला. शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. खासदार डॉ. कोल्हे यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे.

आंबेगाव तालुका शिवसेनेच्यावतीने मंचर येथील संभाजी चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी खासदार कोल्हे व सागर रामसिंग कोल्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

दरम्यान, सागर कोल्हे यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश भोर, शिवसेना जिल्हा सल्लागार रवींद्र करंजखेले, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, मंचरच्या सरपंच किरण राजगुरू, माजी सरपंच दत्ता गांजाळे, सागर काजळे, कल्पेश बाणखेले, अशोक थोरात, अजित चव्हाण, सतीश बाणखेले, अरुण बाणखेले आदी उपस्थित होते.

माजी खासदार आढळराव पाटील यांचे लांडेवाडी हे गाव आहे. लांडेवाडी गावात ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी सागर रामसिंग कोल्हे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारले.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरपंच अंकुश लांडे, माजी उपसरपंच तानाजी शेवाळे, जानकू पानसरे, माजी सरपंच रामदास आढळराव, शाखाप्रमुख विकास निसाळ, खंडेराव आढळराव, अशोक गव्हाणे, श्याम गुंजाळ, सुभाष लांडे, धनेश शेवाळे, गणेश शेवाळे, अंकुश शेवाळे, दत्ता तळपे, जालिंदर शेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी फेसबुकवर वापरलेल्या भाषेबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नमूद केले आहे. आदरणीय शिवाजीदादा, आपल्या बाबत माझ्या बंधूंकडून जी भाषा समाज माध्यमात वापरली गेली, त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. तीन टर्म खासदार राहिलेल्या आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीबाबत अशी भाषा वापरणे योग्य नाही. हे मी जाणतो. सदर पोस्ट डिलीट करण्याची सूचना मी दिलेली आहे. असे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.