पुणे - ‘महापालिकेत मी झाडणकाम करत होते, माझी तब्येत साथ देत नसल्याने माझी नोकरी धाकट्या सुनेला दिली. ती माझा सांभाळ करेल, खर्चासाठी पैसे देईल असे वाटले होते. गेल्या नऊ वर्षापासून ती नोकरी करत असून, तिला ४२ हजार रुपये पगार आहे. पण ती मला बघायला तयार नाही. माझी चुक झाली तिला नोकरी दिली, अशा शब्दात संताप व्यक्त करतानाच रखमाबाई पवार (नाव बदललेले आहे) त्यांची कैफियत मांडत होत्या.
पुणे महापालिकेत घाण भत्त्यात म्हणजे झाडणकाम, सांडपाणी वाहिनी स्वच्छ करणारे, कचरा उचलणारे अशा प्रकारचे घाणीत काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रकारची कामे करणारे कर्मचारी हे अशिक्षित व मागास असल्याने त्यांच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला.
यासाठी शासनाने गठित केलेल्या लाड पागे आयोगाने घाण भत्त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क व अनुकंपाने त्यांच्या इच्छेनुसार नोकरी देता येते. त्याचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना झाला आहे. ज्यास वारसा हक्काने नोकरी मिळाली आहे. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळ करण्याचे हमीपत्र स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेली असते.
त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची संपूर्ण जबाबदारी वारसदार म्हणून नियुक्त कर्मचाऱ्याची असते. पण यात टाळाटाळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
कचरा संकलनाचे काम करणाऱ्या महिलेने तिची नोकरी तिच्या मुलीला दिली. सेवानिवृत्तीनंतर नातवंडे देखील ही महिला सांभाळत आहे. पण तिची मुलगी तिला पैसेच देत नसल्याने उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे. त्यासाठी ही सेवानिवृत्त महिला तिला न्याय मिळावा यासाठी महापालिकेत खेटे मारत आहे.
महापालिकेत सध्या घाणभत्यात काम करणारे सुमारे साडेचार हजार कर्मचारी आहेत. जे कर्मचाऱ्यांना सेवेत २० वर्ष झाली आहेत, त्यांना पेन्शन लागू होते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात ते त्यांच्या नात्यातील किंवा दत्तक घेतलेल्या व्यक्तीला वारसाने नोकरी देतात. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे.
‘घाणभत्त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वारसांना नोकरी दिली जाते. या वारसांनी त्यांची संपूर्ण जबाबदारी घेणे आवश्यक आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सांभाळ करत नाहीत, आर्थिक मदत करत नाहीत अशांवर त्यांचे वेतन थांबविणे, नोकरीवरून कमी करणे अशी कारवाई केली जाऊ शकते. सध्या काही सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या वारसांबद्दल तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.’
- सचिन इथापे, उपायुक्त, सेवकवर्ग विभाग
एजंटांचा सुळसुळाट
घाणभत्त्यात काम करणारे कर्मचारी हे अशिक्षित किंवा खूपच कमी शिकलेले असतात. त्यामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रिया माहिती नसते. या कर्मचाऱ्यांना त्यांचा वारस म्हणून महापालिकेत नोकरी लावण्यासाठी मदत करणे, किंवा ज्या कर्मचाऱ्याच्या घरात नोकरीसाठी कोणी इच्छुक नसेल किंवा मुलगा, मुलगी नसले तर बाहेरच्या व्यक्तीला दत्तक दाखवून नोकरी दिली जाते.
यामध्ये थेट नोकरी खरेदी विक्रीचाच व्यवहार होतो. लाखो रुपयांना ही नोकरी एजंटच्या माध्यमातून विकली जाते. त्यामध्येही अनेक कर्मचाऱ्यांची फसवणूक होते, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.